Sat, Dec 14, 2019 05:39होमपेज › Belgaon › काजू उत्पादनात घट, दरानेही फसविले: उत्पादक हवालदिल, आर्थिक गणित कोलमडले

हुकमी एक्‍का; पण यंदा धक्‍का

Published On: Jun 04 2019 1:29AM | Last Updated: Jun 04 2019 12:18AM
बेळगाव : प्रतिनिधी

शेतकर्‍यांना आर्थिक आधार देणार्‍या काजू पिकांमध्ये यंदा प्रतिकूल हवामानामुळे कमालीची घट झाली आहे. तर दुसरीकडे काजू दरातदेखील घट झाली असून शेतकर्‍यांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. काजू उत्पादक, व्यापारी, कारखानदार अशी काजू पिकांवर अवलंबून असणारी अर्थसाखळी कोलमडून पडली आहे. याचा फटका उत्पादक, व्यापारी आणि कारखानदारांना वर्षभर सहन करावा लागणार आहे. याचा घेतलेला आढावा.

काजू हंगाम अंतिम टप्प्यात आला असून उत्पादनात हंगामात 70 टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे काजू उत्पादक शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले असून आर्थिक नियोजन कोलमडणार आहे. उत्पादनात घट होण्याबरोबर दरदेखील कोसळले आहेत. प्रशासनाने काजू उत्पादकांना दिलासा देण्यासाठी हमीभाव देण्याची मागणी करण्यात येत आहे. 

जिल्ह्यातील बेळगाव, खानापूर, हुकेरी तालुक्यात काजू उत्पादन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. यावर्षी काजू हंगामाला बदलत्या हवामानाचा फटका बसला आहे. यामुळे 70 टक्के उत्पादन घटले आाहे. याचे दूरगामी परिणाम उत्पादकांना वर्षभर भोगावे लागणार आहेत.

काजूपासून मिळणार्‍या उत्पन्नावर उत्पादकांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन असते. शेतीची बी-बियाणे, खते, मजुरी, मशागत, मुलांची शिक्षणे, विवाह, वर्षभराचा कुटुंबाचा खर्च अवलंबून असतो. खरीप हंगामातील शेतीचा खर्च काजू उत्पन्नावर अवलंबून असतो. परंतु यावर्षी काजू हंगाम वाया गेल्याने उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे.

यावर्षी काजूला सुरुवातीच्या काळात चांगला मोहोर होता. परंतु मध्यंतरी धुक्याचे प्रमाण वाढले. त्याचबरोबर वळीव पावसाने पाठ फिरविली आहे. यामुळे काजू मोहोर जळून गेला. परिणामी उत्पादनात घट झाली. 

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दरामध्ये घसरण झाली आहे. मागीलवर्षी काजू 165 रु. प्रति किलो होता. यावर्षी सध्या 117  रु. किलो काजू दर आहे. यामुळे किलोला 50 रुपयाचा फटका सहन करावा लागत आहे. बाजारात व्यापार्‍यांकडून काजू उचल करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे काजू दरात येत्या काळात वाढ होण्याची शक्यता धूसर बनली आहे.

काजू उत्पन्नावर अवलंबून राहून अनेक शेतकर्‍यांनी लग्नकार्य, घरबांधणी कामे सुरू केली आहेत. मात्र उत्पन्नाबरोबर दरामध्ये घट झाल्याने कसरत करावी लागत आहे.
हंगाम वाया, नियोजन विस्कटले

काजू क्षेत्रात वाढ

काजू पिकासाठी कमी प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. त्याचबरोबर बाजारात चांगल्या प्रकारे काजूला दर मिळतो. मागील दहा वर्षात दरामध्ये अपवाद वगळता सातत्याने वाढ झाली आहे. यामुळे शेतकर्‍यांना काजूतून आर्थिक स्थैर्य लाभते. यातून काजू पिकाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली आहे. तालुक्याच्या पश्‍चिम भागात काजूला पोषक माती आणि वातावरण असल्याने क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. अनेक शेतकर्‍यांनी संकरित वाणाच्या झाडांना प्राधान्य दिले आहे. कोकण परिसरातून विकसित केलेली रोपे लावण्यात येत आहेत. या रोपांना तीन ते चार वर्षात काजू लागवड होत आहे. यातून काजूचे क्षेत्र वाढले आहे. यावर्षी दराने दगा दिल्याने शेतकर्‍यांना पहिल्यांदाच अडचणीचा सामना करावा लागत आहे. बेळगाव , खानापूर  परिसरातील काजू पूर्णपणे सेंद्रिय असल्याने ग्राहकांकडून पसंती देण्यात येते. 

काजू उत्पादन होणारी प्रमुख गावे 

बेळगाव तालुका :  बेळगुंदी, बिजगर्णी, बाकमूर, बडस, बेळवट्टी, राकसकोप, सोनोली, यळेबैल, बाकनूर, कुद्रेमानी, बाची, तुरमुरी, कोनेवाडी, गोजगा, मण्णूर, आंबेवाडी, बेकीनकेरे, अतिवाड, किणये, जानेवाडी, बहाद्दरवाडी, कर्ले, रणकुंडये, वाघवडे, संतिबस्तवाड, मच्छे, पिरनवाडी, हुंच्चेनहट्टी, सुळगा, कल्लेहोळ, बेनकनहळ्ळी.
खानापूर : जांबोटी, कणकुंबी, बैलूर, हब्बनहट्टी, उचवडे, वडगाव, ओलमणी, कालमणी, देवाचीहट्टी, चिगुळे, गोल्याळी, नागुर्डा, विश्रांतवाडी, ओतोळी, सिंगीनकोप्प, तोपिनकट्टी, गर्लगुंजी, निडगल, बिदरभावी, लोकोळी, नंदगड, लालवाडी, रुमेवाडी, डुक्‍करवाडी, हलशी, घोटगाळी, माचीगड, शेडेगाळी, हलगा, बिजगर्णी, माडीगुंजी, कापोली, लोंढा, रामनगर, माकडवाडी, शिरोली, गुळंब, मळव.