Thu, Dec 05, 2019 20:45होमपेज › Belgaon › ‘ऑडिओ’च्या एसआयटी चौकशीबाबत आज निर्णय

‘ऑडिओ’च्या एसआयटी चौकशीबाबत आज निर्णय

Published On: Feb 13 2019 1:57AM | Last Updated: Feb 12 2019 11:45PM
बंगळूर : प्रतिनिधी

आमदारांच्या ‘घोडेबाजारा’वरून काँग्रेस-निजद आघाडी आणि भाजप आमदारांत विधानसभेत मंगळवारी जोरदार शाब्दिक चकमक झाली. तर विधान परिषदेत ऑडिओ सीडीचा तपास एसआयटीऐवजी इतर कोणत्याही संस्थेकडून करावा, अशी मागणी करून भाजप आमदारांनी धरणे धरले. 

अखेर येडियुराप्पा यांनी केलेल्या आवाहनानुसार सभापती रमेशकुमार यांनी आपल्या कार्यालयात बुधवारी सकाळी 10.30 वा. सत्तारूढ आणि विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावली असून एसआयटी चौकशीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ऑपरेशन कमळमुळे निजदमधील एका आमदाराची मुंबईत काय अवस्था झाली आहे, याची माहिती दिली. त्यावर आक्षेप घेत भाजप आमदारांनी गोव्यामध्ये काय घडले? याची माहितीही द्यावी, असे आव्हान दिले. यावरून दोन्ही पक्षांतील आमदारांत वाद झाला. या गदारोळामुळे सभापती रमेशकुमार यांनी 15 मिनिटे कामकाज तहकूब केेले.

त्यानंतर कुमारस्वामी म्हणाले, भाजप नेत्यांनी रायचूर जिल्ह्यातील देवदुर्ग तालुक्यातील निजदच्या एका आमदाराशी संपर्क साधला. रात्री बाराच्या दरम्यान सुमारे 25 वेळा फोन केला. आमदारपुत्राला बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना आमिष दाखविण्यात आले. सरकारने याबाबत एसआयटी चौकशीचा निर्णय घेतला आहे. याआधी भाजपशी आघाडी करून सरकार स्थापन केले होते. पण कधीही सूडाचे राजकारण केले नाही, असेही कुमारस्वामी म्हणाले.

परिषदेतही वादावादी

विधान परिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर एसआयटी चौकशी रद्द करून सभागृह समिती, शिष्टाचार समिती किंवा न्यायमूर्तींकडून चौकशीची मागणी केली. सरकारच्या निर्णयाविरोधात सभाध्यक्षांच्या हौद्यात उतरुन धरणे धरण्यात आले. सरकारने धोरणात बदल केला नाही तर दिवसरात्र आंदोलनाचा निर्णय भाजपने घेतला होता. दरम्यान, सभापती रमेशकुमार यांनी बैठक बोलावून एसआयटीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे जाहीर केल्याने दिवसरात्र धरणे आंदोलनाला तूर्तास विराम देण्यात आाला.

व्हिडिओ बॉम्ब कधी?

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ऑडिओ बॉम्ब टाकल्यानंतर प्रदेश भाजपने सोमवारी व्हिडिओ जाहीर करण्याची घोषणा केली होती. मात्र, व्हिडिओ बॉम्बची केवळ प्रतीक्षाच करावी लागत आहे. दिवसभर विधिमंडळात ऑडिओबाबत गदारोळानंतर सायंकाळी व्हिडिओ जाहीर होईल अशी अपेक्षा होती. पण, तसे काहीच घडले नाही. व्हिडिओ कधी जाहीर करणार, याविषयी कोणतेच स्पष्टीकरण भाजपने दिले नाही.