Sun, Dec 08, 2019 21:47होमपेज › Belgaon › दहा गावांचा कौल ठरणार निर्णायक !

दहा गावांचा कौल ठरणार निर्णायक !

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 07 2018 12:17AMखानापूर : वासुदेव चौगुले

तालुक्याचा आजपर्यंतच्या विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहता मतदारसंख्या अधिक असलेल्या गावांनी  साथ दिली तर विजय सुकर होत असल्याचा अनुभव अनेकांना आला आहे या निवडणुकीतही सर्वच उमेदवारांनी मोठी मतदारसंख्या असलेल्या गावांना टार्गेट करुन तेथील प्रचारावर विशेष भर दिल्याने स्टार प्रचारकांच्या सभांनी वातावरण ढवळून निघाले आहे. तालुक्याच्या एकूण 2 लाख मतदार संख्येत दहा मोठ्या लोकसंख्येच्या गावांत तब्बल 51 हजार इतकी मतदार संख्या असल्याने या गावांचा कौल निर्णायक ठरणार आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी   1 लाख 5 हजार 247 पुरुष तर 98 हजार 212 महिला मतदार मतदानासाठी पात्र आहेत. तालुक्याची एकूण मतदारसंख्या 2 लाख 3 हजार 469 आहे. त्यामध्ये प्रमुख दहा गावांची मतदार संख्या 51 हजार 642 इतके असल्याने कमी मतदार असलेल्या गावांना भेट देऊन वेळ वाया घालविण्याऐवजी या मोठ्या मतदार संख्येच्या गावांना भेट देण्यावर उमेदवार विशेष भर देत आहेत.

प्रचारासाठी अवघे चार दिवस शिल्लक आहेत. अडिचशेपेक्षा अधिक गावे आणि 248 मतदान केंद्रे असणार्‍या खानापूर तालुक्यात प्रत्येक गावात पोहचणे आता शक्य नसल्याने आपल्या कार्यकर्त्यांना ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर पाठवून उमेदवार स्वतः मोठ्या मतदारसंख्येच्या गावांना वारंवार भेट देत आहेत. भाजप व काँग्रेसने तर स्टार प्रचाराकांच्या सभांचा धडाका सुरु ठेवला आहे. त्यासाठी बाजारांचे दिवस हेरुन तेथील गर्दी कॅश करण्यासाठी रॅली व प्रचारसभांचे आयोजन केले जात आहे.

कानडी मतदारांत वाढ !

2007 साली विधानसभा मतदार संघांची पुनर्रचना करण्यात आली. त्यामध्ये कित्तूर मतदारसंघातील बोगूर, इटगी, गंदिगवाड, करवीनकोप आणि चिक्‍कमुन्‍नोळी या गावांचा खानापूर मतदारसंघात समावेश करण्यात आला. या पाच गावांचे 13 हजार इतके मतदान आहे. मागील दोन्ही निवडणुकांत हे मतदान सरळसरळ राष्ट्रीय पक्षांच्या पारड्यात गेले होते. परिणामी पूर्व भागातून राष्ट्रीय पक्षांना मिळणारी आघाडी भरुन काढण्यासाठी मराठी पट्ट्यात म. ए. समितीला अधिक जोर द्यावा लागत आहे.

एकीकडे कानडी मतदारांचा टक्का वाढलेला असताना 2007 पूर्वी खानापूर मतदारसंघात असलेला मराठीबहुल रामनगर भाग त्यानंतर हल्याळ-जोयडा मतदारसंघात जोडला गेल्याने साहजिकच मराठी मतांचा टक्का कमी झाला आहे. परिणामी मतदार संघांची पुनर्रचना राष्ट्रीय पक्षांच्या पथ्यावर पडणारी ठरली आहे.