Mon, Jan 20, 2020 09:21होमपेज › Belgaon › दत्ता कट्टी बनले निपाणी भागाचे पहिले खासदार

दत्ता कट्टी बनले निपाणी भागाचे पहिले खासदार

Published On: Apr 07 2019 1:44AM | Last Updated: Apr 07 2019 12:12AM
राजेश शेडगे

भाषावार प्रांतरचना झाल्यावर कर्नाटकात 1957 साली पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत निपाणी भागातील वाळकी गावचे सुपूत्र दत्ता कट्टी हे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाकडून विजयी झाले होते. त्यावेळी एकूण मतदान 3 लाख 61 हजार 325 होते. त्यापैकी 2 लाख 24 हजार 840 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. 

कट्टी यांना 1 लाख 51 हजार 214 तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार  एस. व्ही. पाटील यांना 1 लाख 9 हजार 626 इतकी मते पडली होती. सन 1957 साली लोकसभा व विधानसभेची एकत्रित निवडणूक झाली होती. त्यावेळी अथणीतून जे. बी. पवार-अपक्ष, रायबाग या द्विसदस्य मतदारसंघातून व्ही. एल. पाटील -अपक्ष व एस. पी. तळवळकर हे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाकडून विजयी झाले होते. सदलगा येथून बी. जी. खोत-अपक्ष, चिकोडीतून एस. डी. कोठीवाले-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, निपाणीतून  म. ए. समितीचे बी. डी. नाईक, हुक्केरी या द्विसदस्य मतदारसंघातून एम. पी. पाटील  व चंपाबाई चौगुले या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळविला होता.

1956 साली भाषावार प्रांतरचना झाल्यावर बहुभाषिक मराठी भाग कर्नाटकात डांबण्यात आल्याने सन 1957 साली झालेल्या निवडणुकीत मराठी भाषिकांनी काँग्रेसला अनेक भागातून पराभूत केल्याचे दिसून येते. त्यावेळी बैलजोडी हे काँग्रेसचे चिन्ह होते. 1962 साली झालेल्या लोकसभेच्या तिसर्‍या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने रायबागच्या व्ही. एल. पाटील यांना तिकीट दिले होते. 

त्यावेळी एकूण मतदार 3 लाख 96 हजार 721 होते. त्यापैकी 2 लाख 54 हजार 55 मतदारांनी मतदान केले होते. व्ही. एल. पाटील यांना 1 लाख 66 हजार 110, तर पराभूत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार बी. एच. वराळे यांना 79 हजार 334 मते मिळाली होती. यावेळीही विधानसभेची निवडणूक लोकसभेबरोबर झाली होती. 

यावेळी विधानसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाली होती. अथणीतून डी. बी. पवार, कागवाडमधून एस. व्ही. पाटील, रायबागमधून बी. एस. सौदागर, चिकोडीतून एम. व्ही. शेट्टी, सदलगा येथून एस. एस. पाटील, निपाणीतून जी. के. मानवी, संकेश्‍वरमधून चंपाबाई चौगुले व हुक्केरीतून एस. एस. पाटील यांनी विजय मिळविला होता. या निवडणुकीत 6 जागांवर काँग्रेसने विजय संपादन केला होता.

स्वातंत्र्यानंतरचे पहिले खासदार पाटील

भारतीय स्वातंत्र्यानंतर झालेल्या 1951च्या पहिल्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार एस. व्ही. पाटील विजयी झाले होते. त्यानंतर 1957 साली पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत निपाणी भागातील वाळकी गावचे सुपुत्र दत्ता कट्टी हे शेड्युल्ड कास्ट फेडरेशन पक्षाकडून विजयी झाले.