Mon, Jan 20, 2020 09:42होमपेज › Belgaon › निपाणीतील मराठी शाळांना धोक्याची घंटा

निपाणीतील मराठी शाळांना धोक्याची घंटा

Published On: Jun 04 2019 1:29AM | Last Updated: Jun 04 2019 12:36AM
निपाणी ः राजेश शेडगे

शैक्षणिक वर्षाला सुरूवात होऊन  आठवडा लोटत आला. पण निपाणी शहरातील साखरवाडीतील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा नं. 3 व हणबर गल्‍लीतील शाळा नं. 2 मध्ये पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांनी पाठ दाखविल्याने पटसंख्या घटत  चालली आहे. विद्यार्थ्यांची घटती संख्या मराठी शाळांना धोक्याची घंटा ठरत आहे.

येथील साखरवाडीतील हौसाबाई कॉलनीत सन 1998 पासून स्वत:च्या इमारतीत सुरू झालेली सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा नं. 3 ची स्थापना 1926 साली मंगळवार पेठेत झाली होती. शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणार्‍या या शाळेतील शिक्षकांवर आता पटसंख्या वाढविण्यासाठी विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. सन 2017 साली 41, 2018 साली 34 तर यंदा केवळ 31 विद्यार्थी या शाळेत आहेत. यापैकी पहिलीच्या वर्गात केवळ तीन विद्यार्थी आहेत. 

या शाळेसाठी 6 खोल्या सुस्थितीत आहेत. अक्षरदासोहची खोली मुख्याध्यापकांच्या कार्यालयासाठी वापरली जाते. 2012-13  या शैक्षणिक वर्षात येथे 78 विद्यार्थी  होते. त्यानंतर पटसंख्येला गळती लागली आहे. प्रभारी मुख्याध्यापक एस. एस. तावदारे व शिक्षकांनी उन्हाळी सुट्टीत फिरून हनुमाननगर, साखरवाडी, हौसाबाई कॉलनी, गणेशवाडी भागातून विद्यार्थी शोधण्याचा प्रयत्न केला. परिसरातील अधिक मुले ही मराठा मंडळ, गोमटेश इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये प्रवेश घेतात. घटत्या पटसंख्येमुळे पहिली-दुसरी, तिसरी-चौथी, पाचवी-सहावी व सातवी असे एकत्र वर्ग भरविले जात आहेत.

हणबर गल्ली शाळेत 47 विद्यार्थी

हणबरगल्ली येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा नं. 2 मध्येही केवळ 47 विद्यार्थी आहेत. येथे 4 खोल्यांमध्ये पाहिली ते सातवीचे वर्ग भरविले जातात. दोन वर्षापूर्वी येथील शाळेत 38 पटसंख्या होती. शेजारील कन्नड भाषिक शाळेची पटसंख्या अधिक आहे. येथील शिक्षकांनी हणबरगल्ली, कुंभार गल्ली, महादेव गल्ली, जासूद गल्ली, जत्राट वेस परिसरात फिरून पटसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला आहे.

या शाळेत 4 मराठी व 1 कन्नड भाषिक शिक्षक कार्यरत आहे. मुख्याध्यापिका म्हणून एम. एस. भक्‍ते असून घटत्या पटसंख्येमुळे पहिली-दुसरी, तिसरी-चौथी, पाचवी-सहावी व सातवी असे एकत्र वर्ग भरविले जात आहेत. मराठी शाळांच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पटसंख्येवर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसत आहे.

मराठी शाळांतील घटती संख्या चिंताजनक असून सीमाभागात मराठी जिवंत ठेवण्यासाठी पालकांनी मातृभाषेत मुलांना प्राथमिक शिक्षण देणे गरजेचे आहे.

घटती संख्या चिंताजनक

शासनाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत असूनही सरकारी शाळेत घटती पटसंख्या ही मराठी शाळांसाठी चिंताजनक आहे. शासनाच्या धोरणानुसार 24 विद्यार्थ्यांना 1 शिक्षक अशी नियुक्‍ती होते. पहिली ते सातवीच्या मराठी शाळांमध्ये 4 मराठी व 1 कन्नड भाषिक शिक्षक कार्यरत आहेत. घटत्या संख्येमुळे शिक्षकांसमोरही अडचणी उभ्या ठेपल्या आहेत. त्यातच कमी संख्येच्या शाळा विलिणीकरणाचा घाट शासन घालत असल्याने शिक्षकांसमोरही प्रश्‍न उभा ठेपला आहे.