Sun, Dec 15, 2019 03:13होमपेज › Belgaon › कन्नडिगांची कोल्हेकुई

कन्नडिगांची कोल्हेकुई

Published On: Jun 17 2019 2:08AM | Last Updated: Jun 17 2019 2:08AM
बेळगाव : प्रतिनिधी

कन्नड संघटनेचे मूठभर कार्यकर्ते दर रविवारी शहरातील विविध भागात मराठी व्यापार्‍यांवर दादागिरी करत आहेत. रविवारीआरपीडी आणि टिळकवाडी परिसरात कन्नड कार्यकर्त्यांनी कन्नड फलकांसाठी व्यापार्‍यांना धमकावल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

बेळगावचे कानडीकरण करण्यासाठी सरकार दरबारी सातत्याने प्रयत्न होतात. सरकारी इमारती, बसेस, संस्थांचे फलक, कागदपत्रे, परिपत्रके कन्नडमध्येच देण्यात येतात. अधेमधे शहरातील व्यापार्‍यांच्या दुकानांचे कानडीकरण करण्याचा फतवा काढण्यात येतो. फलकावर साठ टक्के कन्नड भाषेत लिहिण्यात यावे, यासाठी नोटीसा बजावण्यात येतात. महापालिका आणि कामगार खात्याकडून व्यापार्‍यांना नोटीसा बजावण्यात येतात. पण, आता कन्नड संघटनेचे काही कार्यकर्ते दर रविवारी कन्नडमध्ये फलकांसाठी शहरातील विविध भागांत फिरत आहेत.

आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या दुकानांतही त्यांनी धमकी दिल्यामुळे अनेक फलकांवर कन्नड लिहिण्यात आले आहे. पण, शहरातील बाजारपेठेतही  व्यापार्‍यांना कन्नड फलक लावण्यासाठी दबाव येत आहे. आज आरपीडी कॉर्नर आणि टिळकवाडी परिसरातील काही दुकानांत जाऊन या कार्यकर्त्यांनी धमकावण्याचा प्रयत्न केला. मराठी, इंग्रजीऐवजी फक्त कन्नडमध्येच फलक लावण्यात यावेत, अन्यथा आंदोलन करु, असे सांगून दबाव घालण्याचा प्रयत्न केला. पण, काही व्यापार्‍यांनी याबाबत कार्यकर्त्यांना  आम्ही कोणत्या भाषेत फलक लिहायचे, हे सांगू नका, असे सांगत जाब विचारला. त्यामुळे वादावादी आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दर रविवारी असा प्रकार होत आहे. त्यामुळे व्यापार्‍यांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सोशल मीडियावर चर्चा करून कन्नड कार्यकर्ते दर रविवारी शहरातील विविध भागात मराठी व्यापार्‍यांना टार्गेट करत आहेत. त्यामुळे मराठी भाषिक व्यापार्‍यांत संताप व्यक्त होत आहे.

म.ए.समिती घेणार जिल्हाधिकार्‍यांची भेट

कन्नड भाषेतील फलकांसाठी व्यापार्‍यांवर दादागिरी करून दहा दिवसांची मुदत देणार्‍या कन्नड संघटनेविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोमवार दि. 17 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकार्‍यांची भेट घेणार आहेत.

व्यापार्‍यांना कन्नडमध्येच फलक लावण्यासाठी दादागिरी करण्याचा प्रकार आरपीडी कॉर्नर व टिळकवाडी परिसरात घडला आहे. त्याविरोधात मराठी भाषिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्रिभाषा धोरणानुसार महापालिकेत मराठी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत फलक लावण्याचा ठराव झाला आहे. त्यानुसार शहरात सर्वत्र फलक लावण्यात येत आहेत. पण, कन्नड संघटनेचे काही कार्यकर्ते व्यापार्‍यांवर दबाव घालून कन्नडमध्येच फलक लावण्यासाठी दादागिरी करत आहेत. त्यामुळे शहरातील भाषिक वातावरण बिघडण्याची भीती आहे. कन्नड संघटनांचा हा प्रकार तत्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी करण्यासाठी सोमवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांची भेट घेण्यात आहे, असे कळवण्यात आले आहे.