Sun, Dec 15, 2019 03:14होमपेज › Belgaon › ‘ऑपरेशन कमाल’

‘ऑपरेशन कमाल’

Published On: Jan 26 2019 1:11AM | Last Updated: Jan 25 2019 11:28PM
बंगळूर : प्रतिनिधी

भाजपच्या ऑपेरशन कमळला जोरदार प्रत्युत्तर देताना काँग्रेस-निजद आघाडीने आता ऑपरेशन कमाल राबवण्याची तयारी सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत आता भाजपचेच आमदार फोडण्याचा प्रयत्न आघाडी करत आहे. खुद्द मुख्यमंत्री कुमारस्वामींनीच भाजपच्या दोन आमदारांना बंपर ऑफर दिल्याचे समजते.

काँग्रेस विधिमंडळ बैठकीसाठी व्हीप जारी केल्यानंतरही चार आमदार अनुपस्थित राहिले. यामुळे आघाडी सरकारला ऑपरेशन कमळची धास्ती कायम आहे. दोन अपक्षांनी पाठिंबा काढून घेतल्याने आघाडीचे संख्याबळ 118 तर दोन अपक्षांचा पाठिंबा मिळविल्यानंतर भाजपचे संख्याबळ 106 झाले आहे. सरकार अल्पमतात आणण्यासाठी भाजपला आघाडीतील आणखी 6 आमदार फोडावे लागणार आहेत. नाराज असणारे चार आमदार आपण काँग्रेसमध्ये असल्याचे सांगत असले तरी त्यांच्या जाण्याची भीती कायम आहे. अशावेळी सरकार वाचविण्यासाठी प्रति ऑपरेशन कमळ अर्थात ऑपरेशन कमाल हा एकच उपाय आहे. 

काँग्रेस आणि निजदमधील काही आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. पण, मंत्रिमंडळ विस्तारावेळी त्यांना संधी मिळाली नसल्याने ते नाराज आहेत. अनेकदा समजूत घातल्यानंतरही ते ऐकण्याच्या तयारीत नाहीत. भाजप प्रवेशासाठी ते इच्छुक आहेत. त्यांचा पक्षत्याग ग्राह्य धरून कुमारस्वामींनी आता भाजपचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्या पक्षातील काही आमदार सहजपणे गळाला लागू शकतात, असा विश्‍वास कुमारस्वामींना आहे. त्यादृष्टीने ते प्रयत्न करत आहेत. चार ते पाच आमदारांना फोडल्यास आघाडीतील उर्वरित नाराज आमदार पक्षत्यागास धजावणार नाहीत; शिवाय सरकारला कार्यकाळ पूर्ण करणे सहज शक्य होणार असल्याचा हिशेब कुमारस्वामींनी घातला आहे.

ते आमदार कोण?

मुख्यमंत्र्यांनी ज्या भाजप आमदारांना बंपर ऑफर दिली आहे, ते आमदार कोण हे स्पष्ट झालेले नाही. पण त्यापैकी एक आमदार बेळगाव जिल्ह्यातील असल्याचे समजते. बेळगाव जिल्ह्यातील काही आमदारांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरवात निजदमधूनच केली होती. अशा आमदारांशी कुमारस्वामींनी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जारकीहोळी मुंबईतच

रमेश जारकीहोळींसह काही आमदार अजूनही मुंबईत असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेस वरिष्ठांना त्यांनी पक्ष सोडणार नसल्याचे कळविले असले तरी गेल्या अनेक दिवसांपासून ते नियमितपणे भाजपच्या संपर्कात आहेत.

आमदारांवर गुप्तचरांची नजर

अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याने प्रत्येक काँग्रेस आमदाराच्या हालचालींवर नजर ठेवण्याची सूचना गुप्तचर खात्याच्या प्रमुखांना देण्यात आली आहे. दर तासाला घडामोडींची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्याची सूचना करण्यात आली आहे. दोन दिवस रिसॉर्टमध्ये कोंडून ठेवल्यानंतरही काही आमदारांवर संशय असल्यानेच त्यांच्यावर गुप्तचरांची नजर असणार आहे.