Thu, Dec 05, 2019 20:47होमपेज › Belgaon › लॉजवर नियंत्रण कुणाचे?

लॉजवर नियंत्रण कुणाचे?

Published On: Jul 20 2019 12:46AM | Last Updated: Jul 19 2019 9:09PM
निपाणी : मधुकर पाटील

कामानिमित्त बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांसह कुंटुंबीयांना सुरक्षेचे आणि चांगले ठिकाण म्हणून लॉजचा आधार घेतला जातो. त्यामुळे हॉटेलव लॉजिंग व्यवसायाचे जाळे व्यावसायिकांनी विणले आहे. पण, वाढती स्पर्धा आणि मंदीमुळे लॉजचा मूळ उद्देश बाजूला पडत असून लॉजमधून अवैध धंदे वाढत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर पूर्णपणे नियंत्रणाची गरज आहे.

सीमाभागातील सोयीचे ठिकाण म्हणून निपाणीचे नाव ने घेतले जाते. राष्ट्रीय महामार्गाला लागूनच शहराची वस्ती आहे. महाराष्ट्रातील अनेकांना निपाणी शहर अनेक दृष्टीने अनुकूल आणि सुरक्षित आहे. अलिकडे चार-पाच महिन्यांत लॉजवर पडलेले छापे वगळता आजतागायत अशाप्रकारे  कारवाई झाली नव्हती. लॉज व्यवसायामध्ये असणारी स्पर्धा आणि आलेल्या मंदीमुळे लॉज व्यावसायिकांनी पे्रमीयुगुलांना आणि अनेक जोडप्यांकडून अधिक रकमेची आकारणी होत असल्याचे समजते. त्यातून अवैध धंदे वाढत आहेत.

गुरूवारी पडलेल्या छाप्यावेळी  तीन जोडपी सापडली असून लॉजच्या मागील दाराने पलायन केलेल्या जोडप्यांची संख्या आठ-नऊ असल्याचे समजते. त्यामुळे लॉजचा उद्देश बाजूला जात अवैध आणि अनैतिक केंद्रे अशी ओळख होत आहे. छाप्यातील जोडप्यांमध्ये एकही जोडपे कुटुंबातील सदस्यांसह नव्हते. अविवाहित महाविद्यालयीन तरूणीपासून 45 वर्षांपर्यंतच्या  विवाहित महिलांचाही समावेश दिसून आला. केवळ लॉजवरील कारवाईने याला आळा बसणार नसून अवैध व्यवसायाची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी बंदोबस्त करण्याची गरज आहे. पोलिसांनी अवैध व्यवसाय समूळ नष्ट करण्यासाठी सक्षम राहून कारवाईही गरजेची आहे.

स्थानिक पोलिसांबाबत प्रश्‍नचिन्ह

एका बाजूला लॉजची संख्या  वाढत आहे. दुसरीकडे केवळ  चार महिन्यांत चिकोडीचे एएसपी जी.के.मिथुनकुमार यांनी तिसर्‍यांदा निपाणीत छापे टाकले आहेत. यावरून स्थानिक पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

कर्म एकाचे, बदनाम  सर्वजण

निपाणीत सर्वच लॉजमध्ये अनैतिक धंदे चालतात, असे नाही. यापूर्वी काही लॉजवर जोडप्यांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. तरीही काही लॉजवर अवैध धंदे चालतात. नियमांचे पालन करुन प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे बदनाम होत आहेत.