Thu, Dec 05, 2019 20:47होमपेज › Belgaon › शहरवासियांसाठी 24 तास कार्यरत राहणार : आयुक्त अशोक दुडगुंटी

शहरवासियांसाठी 24 तास कार्यरत राहणार : आयुक्त अशोक दुडगुंटी

Published On: Jul 09 2019 1:11AM | Last Updated: Jul 08 2019 8:55PM
बेळगाव : प्रतिनिधी

शहरातील अनेक समस्यांबाबत मला चांगली जाण आहे. त्यामुळे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी माझे प्राधान्य आहे. त्यांच्यासाठी 24 तास हेल्पलाईन सुरू राहणार असून आपणही समस्या निवारण्यासाठी कार्यरत राहणार आहे, असे मत महापालिका नूतन आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी व्यक्त केले.

शशिधर कुरेर यांची 29 जून रोजी बदली झाली. त्यांच्या जागी सरकारने दुडगुंटी यांची नियुक्ती केली. शनिवारी याबाबत अधिकृत आदेश मिळाल्यानंतर सोमवारी सकाळी दुडगुंटी यांनी महापालिकेत जाऊन सूत्रे स्वीकारली. महापालिका कार्यालयात जाण्याआधी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी कार्यालयात जाऊन सूत्रे स्वीकारली.
पत्रकारांशी बोलताना दुडगुंटी म्हणाले, शहरातील अनेक समस्यांबाबत मला जाणीव आहे. पावसाळा असल्यामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्या समस्या प्राधान्याने सोडवणार आहे. साथीचे रोग फैलावणार नाही, याचीही काळजी घेण्यात येणार आहे. लोकांनी आपल्या तक्रारी महापालिकेकडे कराव्यात, यासाठी 24 हेल्पलाईनची सोय करण्यात येणार आहे. त्या सोडवण्यासाठी कार्यरत राहणार आहे.

शहरातील अनेक वसाहती बेळगाव नगरविकास प्राधिकरणाकडून (बुडा) हस्तांतर होणे आवश्यक आहे. त्यावरही निर्णय घेण्यात येणार आहे. महापालिकेत अनेक जाणकार अधिकारी आहेत. त्यांची मदत घेऊन कामे मार्गी लावण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले. महापालिकेच्या अनेक दुकानांकडून भाडे वसुली होत नाही, मंत्र्यांच्या बैठकीतही हा विषय आला होता, याबाबत पत्रकारांनी त्यांना माहिती दिली असता, महापालिकेच्या जागा, दुकानांतून मिळणार्‍या महसुलाकडे आपले लक्ष असणार आहे, असे दुडगुंटी यांनी सांगितले.

हो, मराठी माणसे अधिक आहेत..!

पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी बेळगावात मराठी भाषिक अधिक आहेत. त्यामुळे मराठी वृत्तपत्रात महापालिकेबाबत अधिक वृत्तांत प्रसिध्द होतो, असे सांगितले. त्यावर आयुक्त दुडगुंटी यांनी, हो, मीही बेळगाव परिसरात असल्यामुळे बेळगावात मराठी माणसे अधिक आहेत, हे माहिती आहे, असे सांगितले.

आता नको, बाहेर व्हा..!

अशोक दुडगुंटी हे आपल्या कक्षात येताच, महापालिका कर्मचारी आणि काही संघटनांचे कार्यकर्ते त्यांचे स्वागत करण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन कक्षात गेले. पण, दुडगुंटी यांनी त्यांना अडवत पुष्पगुच्छ वगैरे आता नको, बाहेर व्हा, असे सांगितले. त्यानंतर अर्ध्या तासाने त्यांनी अधिकार्‍यांना कक्षात बोलावून घेतले.