Thu, May 23, 2019 22:14
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › मनपाला ‘लकवा’

मनपाला ‘लकवा’

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 14 2018 12:17AMबेळगाव : प्रतिनिधी

मनपा दरवर्षी शहर स्वच्छतेवर 40 कोटी रुपयांचा अवाढव्य खर्च करते. परंतु, बेळगाव शहरातील खासबाग, वडगाव परिसरात चिकुनगुनिया, डेंग्यूची साथ पसरूनही अद्याप पुरेशी उपाययोजना करण्यात आलेली नाही. मनपाचा आरोग्य विभाग सुस्तच असून, त्यामुळे मनपालाच लकवा मारला आहे, अशी स्थिती उद्भवली आहे. बुधवारी आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनीच डेंग्यू, चिकनगुनियाच्या साथीवरून आरोग्याधिकार्‍यांना धारेवर धरले. 

पावसापूर्वी शहरातील गटारी व नाल्यांची स्वच्छता केली नसल्यामुळेच बेळगाव दक्षिण विभागामध्ये चिकुनगुनिया व डेंग्यूची लागण झालेली आहे. वडगाव, खासबाग, भारतनगर, आनंदनगर, केशवनगर, जुने बेळगाव भागामध्ये दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण चिकुनगुनिया व डेंग्यूने त्रस्त आहेत.

हे रोग उद्भवू नयेत म्हणून मनपा आरोग्य विभागाने काय केले? असा सवाल नगरसेवक रवि धोत्रे यांनी आरोग्य अधिकार्‍यांना केला.  डास निर्मूलनासाठी मनपाने गटारी व नाल्यांवर औषध फवारणी केली नसल्यामुळेच हे रोग उद्भवल्याची टीकाही धोत्रे यांनी केली.

मनपा आरोग्य विभागाने पावसाळ्यापूर्वी गटारी व नाल्यांची साफसफाई केली नसल्यामुळेच शहरात डासांचे प्रमाण वाढीस लागले. त्या कारणामुळेच चिकुनगुनिया व डेंग्यू उद्भवले. यापुढे तरी आरोग्य विभागाने गंभीरतेेने शहर स्वच्छताव डास निर्मूलनाचे काम हाती घ्यावे, अशी सूचनाही बैठकीत करण्यात आली.

*बदलीची मागणी

मनपा आरोग्य विभागातील कामचुकार आरोग्य निरीक्षक व कर्मचार्‍यांच्या बदलीची मागणीही बैठकीमध्ये करण्यात आली. 

*आरोग्याधिकार्‍यांचा दावा

आरोग्याधकारी डॉ. शशिधर नाडगौडा स्पष्टीकरण देताना म्हणाले, बेळगाव शहराला 5 ते 6 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. त्यामुळेही पाण्याचा साठा करण्याकडे महिलांचा कल असतो. या साठलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. डास निर्मूलनासाठी वडगाव, खासबाग, आनंदनगर, भारतनगर आदी भागामध्ये फॉगिंगबरोबरच गटारी-नाल्यांवर औषध फवारणी केली जात आहे.

प्रत्येक स्वच्छता कंत्राटदाराकडे औषध फवारणी करणारे पंप असून त्याद्वारे औषध फवारणी केली जात आहे. मनपाकडे फॉगिंग करण्यासाठी एकूण 6 मशिन्स असून त्याद्वारे फॉगिंग सुरू आहे, असाही दावा आरोग्य निरीक्षकांनी केला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष राजू बिर्जे होते. तर महापौर  बसाप्पा चिक्कलदिनी आणि उपमहापौर मधुश्री पुजारींसह सारे सदस्य उपस्थित होते.