Sun, Dec 08, 2019 21:45होमपेज › Belgaon › चिक्कोडी लोकसभा मतदार संघ : भाजपात धुसफूस, काँग्रेसचे एकला चलो रे..! 

चिक्कोडी लोकसभा मतदार संघ : भाजपात धुसफूस, काँग्रेसचे एकला चलो रे..! 

Published On: Feb 09 2019 1:40AM | Last Updated: Feb 08 2019 8:51PM
बेळगाव : संजय सूर्यवंशी 

पक्षाबरोबरच व्यक्तीगत प्रतिष्ठा  महत्वाची मानणार्‍या नेत्यांचा भरणा चिक्कोडी भागात अधिक. म्हणूनच तर कोणाचं काहीही होवो, सत्ता माझीच हवी, असे त्यांना वाटते. जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक काळात भाजप नेत्यांमधील दुभंगलेली मने, मी ही इच्छुक म्हणत मास लिडर बनण्यासाठी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरेंनी टाकलेला बॉम्ब अन् भाजप इच्छुकांच्या साठमारीत विद्यमान खा. प्रकाश हुक्केरी यांनी ...माझ्या शिवाय आहेच कोण? घेतलेली भूमिका यामुळे चिक्कोडी लोकसभेचे राजकारण रंगतदार होणार आहे. 

चिक्कोडी लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला. मुंबई प्रांतातून लढलेली 1951 ची पहिली लोकसभा असो अथवा त्यानंतरच्या सलग तीन म्हैसूर प्रांतातून झालेल्या लढती असोत. काँग्रेसचा येथे नेहमीच वरचष्मा राहिला आहे. 40 वर्षे काँग्रेसचे प्राबल्य राहिलेल्या या मतदार संघात कमाल केली होती ती स्व. बी. शंकरानंद यांनी 40 पैकी 25 वर्षे म्हणजे सलग सातवेळा ते खासदार राहिले. मात्र, 1996 च्या निवडणुकीत जनता दलाच्या रत्नमाला सावनूर यांनी शंकरानंद यांना हरवले आणि काँग्रेसला उतरती कळा लागली. कारण, 1996 नंतर या मतदार संघात रमेश जिगजिनगी यांनी लोकशक्ती, संयुक्त जनता दल आणि भाजप अशा तीन पक्षांतून लढत विजयाची हॅटट्रिक साधली. यानंतर हा मतदार संघ राखीव झाल्याने जिगजिनगी विजापूर जिल्ह्यात गेले. यानंतर दुसरे रमेश अर्थात रमेश कत्ती हे 2009 मध्ये भाजपचे खासदार बनले. तब्बल 20 वर्षे ग्रहण लागलेल्या काँग्रेसला 2014 च्या निवडणुकीत खा. प्रकाश हुक्केरी यांनी विजयाचा सूर्य दाखवला. 

काँग्रेसला खा. हुक्केरींशिवाय पर्याय नाही हे जरे खरी असले, तरी राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना अचानक खासदारकीची माळ गळ्यात पडल्यानंतर हुक्केरींची काही गणितेही चुकत गेली आहेत. परवा एकसंब्याला खा. हुक्केरींनी भव्य सभा घेतली. चिक्कोडी लोकसभेच्या  विकास निधीच्या मंजुरीपत्राचे वितरण करण्यासाठी ही सभा असल्याची जाहिरात  केली. परंतु, खरे तर  ग्रामीण भागाशी काहीशी तुटलेली नाळ पुन्हा जोडण्यासाठीही ती सभा होती. कारण, आमदार म्हणून ग्रामीण भागाशी असलेली नाळ हुक्केरींना खासदारकीच्या काळात राखता आलेली नाही. पूर्वी आठपैकी दोन काँग्रेसचे आमदार असलेल्या लोकसभा मतदार संघात आता काँग्रेसचे चार आमदार झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत ते प्रचारात गुंतले खरे परंतु, पोराचा मतदार संघ वगळता त्यांना इतर मतदार संघ फारसे दिसले नाहीत. इतर मतदार संघात जाता आले नाही हे एकवेळ ठिक आहे. परंतु, ज्या अथणी व कागवाड मतदार संघाने त्यांना भरभरून मते दिली, त्या मतदार अथणी व कागवाड मतदार संघातील प्रचारासाठी ते फारसे उत्सुक दिसले नाहीत.आज या दोन्ही मतदार संघात भाजपचे जाऊन  काँग्रेसचे आमदार आले. खरे तर चार-आठ सभा आणि प्रचाराला जाऊन त्यांना विजयाचे श्रेय घेता आले असते. परंतु, पुत्रप्रेमापोटी ते चिक्कोडी-सदलग्यात गुंतले आणि अथणी-कागवाडला जो करिष्मा घडला, त्याचे श्रेय आपसूकच रमेश जारकीहोळींना गेले. तेव्हा निजदमध्ये असलेले श्रीमंत पाटील यांनी येथून खासदारकी लढविली व तिसर्‍या क्रमांकाची मते घेतली होती. या मतांसाठी हुक्केरींना झगडावे लागणार आहे. आमदारकीला राज्यात सर्वाधिक मते घेणारे म्हणून प्रशंसा मिळविलेल्या खासदार प्रकाश हुक्केरींना खासदारकीत निसटता विजय मिळाला आहे. त्यामुळे ही धुगधूगही त्यांना राहणारच आहे. काँग्रेसचे तिकीट मिळणार हे निश्‍चित. परंतु, अधूनमधून येथे जारकीहोळी बंधूंपैकी कोणी तरी डोकावत असते. गोकाक की चिक्कोडी जिल्हा यावरूनही दोन्ही नेत्यांमध्ये आधीपासून अंतर्गत चढाओढ आहेच. रमेश व सतीशना मानणारा वर्ग या मतदार संघात आहे. त्यांची साथ एकहाती मिळणार का?  भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस वाढते की ती शमविण्यात भाजपचे हायकमांड यशस्वी होते, यावरही काँग्रेसचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. 

चारी दिशांना चार तोंडे 

भाजपमध्ये सध्याचे चित्र जरी शांततेचे असले, तरी तिकीटासाठी अंतर्गत घासाघीस सुरू झाल्याचे सांगण्यात येते. गेल्या निवडणुकीत अवघ्या 3 हजार मतांनी पराभूत झालेले रमेश कत्ती पुन्हा रिंगणात उतरण्याची चिन्हे आहेत. याशिवाय भाजपमधून आण्णासाहेब जोल्ले, लक्ष्मण सवदी यांनाही तिकीटाची अपेक्षा आहे. क्लास लिडरची प्रतिमा मोडीत काढून एकदा मास लिडर व्हायचे, लोकनेता झालो तर मंत्री होईन, अशी स्वप्ने आता राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांना पडू लागली आहेत. त्यामुळे त्यांनी देखील आपण इच्छुक असल्याचे जाहीर करून टाकले आहे.  भाजपचे हे चारीही नेते मातब्बर मानले जातात. हायकमांडकडे सर्वांचा वशिला देखील दांडगा आहे. त्यामुळे यापैकी कोणाला तिकीट मिळणार? हे मात्र गुलदस्त्यात आहे. केंद्र पातळीवर  पंतप्रधान मोदी   व अध्यक्ष शहा यांच्याशी डॉ. कोरेंचा असलेला घरोबा, निपाणीत प्रचाराला आलेले अमित शहा व स्मृती इराणी यांच्याशी आण्णााहेब जोल्ले यांची वाढलेली जवळीक, संपूर्ण मतदार संघाचा आवाका तसेच टक्कर देणारा उमेदवार म्हणून रमेश कत्ती आणि राजकीय पुनर्वसन करण्यासाठी लक्ष्मण सवदींचे नाव, अशा त्रांगड्यात भाजप तिकीट कोणाला देणार? याची निश्‍चितच उत्सुकता आहे. 

रमेश कत्ती जरी मास लिडर असले, तरी त्यांना पक्षांतर्गत विरोध होण्याची शक्यता अधिक आहे. कारण, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रमेश कत्तींनी काँग्रेस नेतृत्वाला हाताशी धरून सर्वांना बाजूला करत सत्ता काबीज केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांना जरी तिकीट मिळाले तरी जोल्ले दांपत्य, माजी मंत्री लक्ष्मण सवदी आणि विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ त्यांना मदत करणार का? हा प्रश्‍न आहे. शिवाय रमेश कत्ती अलिकडच्या काळात लाईमलाईटमध्ये देखील फारसे आलेले नाहीत. डॉ. कोरेंना कत्ती बंधूंचे राजकारणातील वर्चस्व मोडून काढण्यासाठी हीच संधी आहे, असे वाटते. त्यामुळे ते आतापासूनच त्या भागातील सामाजिक कार्य, यात्रा, जत्रा यामध्ये सक्रीय सहभागी होताना दिसत आहेत.

उमेदवारी अनिश्‍चित : खा. हुक्केरी 

खा. प्रकाश हुक्केरींना काँग्रेसकडे पर्यायी उमेदवार नाही, हे त्यांनाही चांगलेच ठाऊक आहे. कार्यकर्ते आतापासूनच ‘येऊन येऊन येणार कोण?’ अशी घोषणाही करू लागले आहेत. परंतु, खासदार हुक्केरी मात्र तिकीट आपल्यालाच मिळणार, हे कबूल करायला तयार नाहीत. अन्यथा ‘पुन्हा तिकीट मिळेल की नाही माहिती नाही’  असे एकसंबा येथील सभेत म्हणाले नसते. 

एकदा खासदार व्हावे, ही डॉ. कोरेंची अपेक्षा 

राजकारणात असल्याशिवाय आजकाल पानाची टपरी देखील चालवता येत नाही, या मताचे असलेल्या राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांना एकदा जनतेतून निवडून यायचे आहे. त्यासाठी त्यांनी आपले जाळे फेकले आहे. हे त्यांचे जाळे कोणाला शह देण्यासाठी आहे की, स्वतःसाठीच आहे, हे तिकीट वाटपाच्या वेळी स्पष्ट होईल.