बंगळूर : प्रतिनिधी
दुष्काळामुळे अंतर्जल पातळी घटली असून जलसंरक्ष आणि जागृती कार्यक्रम हाती घ्यावे. पावसाचे पाणी जिरवण्याबाबत विशेष योजना आखण्याची सूचना मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली.
बुधवारी (दि. 12) जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असणार्या ठिकाणी खासगी कूपनलिका असणार्या मालकांकडून भाडे करार करावा. रोहयो अंतर्गत पाणी योजनांची कामे हाती घ्यावीत. सध्या सुरु असणारी कामे त्वरित पूर्ण करावीत. टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार्यांचे बिल त्वरित मंजूर करावे. बिल आदा करण्यास विलंब झाला तर संबंधित ग्राम पंचायतीला ते भरण्याची सूचना करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य पातळीवरील, जिल्हा पातळीवरील अधिकार्यांनी गावांना भेटी देऊन विकासकामांची पाहणी करावी. दुष्काळी कामे योग्यरित्या हाती घेण्यात आल्याबाबत शहानिशा करावी. विभाग पातळीवर सक्तीने पेन्शन अदालत, महसूल अदालत घेण्याची सूचनाही बैठकीत करण्यात आली.
उद्योग सुरु करण्यासाठी जमीन परिवर्तनासाठी अर्ज केलेल्यांना सहकार्य करावे. सरकारी शाळा, क्रीडा मैदान, स्मशान आदींसाठी पुढील दहा वर्षांत आवश्यक जमीन निश्चित करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.