Thu, Dec 12, 2019 22:11होमपेज › Belgaon › जारकीहोळी बंधूंच्या वादात हुक्केरींचा बळी

जारकीहोळी बंधूंच्या वादात हुक्केरींचा बळी

Published On: May 25 2019 2:08AM | Last Updated: May 25 2019 12:20AM
चिकोडी : काशिनाथ सुळकुडे

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या चिकोडी लोकसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षित लागला आहेे. यात 1 लाखाहून अधिक मताधिक्क भाजपाला मिळाल्याने  आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. प्रकाश हुक्केरींसारख्या ज्येष्ट नेत्याच्या पराभवाची कारणे व आत्मचिंतन करण्याची गरज आहे. चिकोडी लोकसभेतील कांही घरच्या भेदींमुळे व भाजपाच्या वाटेवर असलेले माजी मंत्री रमेश जारकीहोळींच्या कटकारस्थानामुळे त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावावे लागल्याची चर्चा सुरु आहे. 

चिकोडी लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून माजी केंद्रिय मंत्री बी.शंकरानंद यांना सातवेळा याचा मतदारसंघातून निवडून गेले आहे. त्यांच्यानंतर जनता दल, भाजपाकडे असलेला मतदारसंघ मोदींच्या लाटेत देखील प्रकाश हुक्केरींनी जिंकून पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकाविला होता. प्रकाश हुक्केरी अनेकदा आमदार, विधानपरिषद सदस्य, मंत्री, सद्या खासदार पद भूषविले असून चांगले जनसंपर्क, कार्यकर्त्यांचा पाठिंबा, विकासकामांमुळे ते राज्यात परिचित होते.   

या निवडणूकीत दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना 5 ते 20 हजार  मताधिक्काने विजयी होण्याचा विश्‍वास होता. पण ज्येष्ठ नेते काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरींना 1 लाख 16 हजार मतांच्या फरकाने पराभव पत्करावा लागल्याने काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. माजी पालकमंत्री गोकाकचे आ.रमेश जारकीहोळींकडून कांही महिन्यापूर्वी पालकमंत्री पद काढून घेतल्यामुळे ते आपल्या समर्थक आमदारांसह रेसॉर्ट राजकारण करत सरकार कोसळविण्याचा प्रयत्न केला  होता.  यामुळे  या लोकसभा निवडणुकीत ते खुल्या मनाने अनेक ठिकाणी भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार केल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर त्यांचे समर्थक असलेल्या काँगे्रस पक्षातील आजी, माजी आमदारांना व नेत्यांना देखील काँग्रेस पक्षविरोधी कारवाया करण्यास लावल्याचे बोलले जात आहे. यामुळेच चिकोडी लोकसभा मतदारसंघ जारकीहोळींचा प्रभाव असलेल्या अथणी, कागवाड, रायबागसह इतर मतदारसंघात काँग्रेस पक्षाला चांगला फटका बसल्याचे दिसून येत आहे. 

का झाला प्रकाश हुक्केरींचा पराभव?

मागील पाच वर्षात प्रकाश हुक्केरी मतदारसंघातील अनेक गांवांना भेट न दिल्याचा आरोप झाला असला तरी त्यांनी अनेक कामे राबविली हे सत्य आहे. तसेच त्यांनी भाजपाचा उमेदवार जाहिर होण्यापूर्वी सर्व मतदारसंघ पिंजून पहिल्या टप्प्यातील प्रचार पूर्ण केला होता. त्यामुळे ते प्रचारात आघाडीवर होते. पण या निवडणूकीत विरोधी पक्षातील नेत्यांपेक्षा काँग्रेस स्वपक्षातील अनेक नेत्यांनी हात दिल्याचे दिसून आले. यामुळेच  रायबाग, अथणी, हुक्केरी, यमकनमर्डी, कुडची, कुडची, कागवाड मतदारसंघात भाजपाला मताधिक्क मिळाले आहे.  तसेच अनेक नेते काँग्रेस पक्षासोबत राहून छुप्प्या पध्दतीने विरोधी पक्षाला पाठिंबा दिल्याचे बोलले जात आहे.