Sat, Sep 21, 2019 07:07होमपेज › Belgaon › पाठलाग करून पेट्रोल पंप मालकाला लुटले

पाठलाग करून पेट्रोल पंप मालकाला लुटले

Published On: May 20 2019 1:23AM | Last Updated: May 19 2019 11:46PM
यमकनमर्डी : वार्ताहर

पेट्रोल पंप मालकाच्या वाहनाचा पाठलाग करून 2 लाख 40 हजार रुपये लुटण्यात आल्याची घटना हत्तरगीजवळ शनिवारी रात्री घडली. महावीर बाळासाहेब पाटील (रा. यमकनमर्डी) असे लुटण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी यमकनमर्डी पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

यमकनमर्डी येथील रहिवासी महावीर पाटील यांचा हत्तरगीजवळ पेट्रोल पंप आहे. नेहमीप्रमाणे महावीर शनिवारी रात्री 9 वा. पेट्रोल पंप बंद करून दिवसभरात जमलेले पैसे घेऊन ते घरी कारने जात होते. दरम्यान, हत्तरगीपासून अर्धा कि.मी.वर ते आले असता त्यांचा पाठलाग करत येणार्‍या कारचालकाने त्यांच्या कारसमोर गाडी आडवी लावून त्यांना महामार्गावरच थांबविले. कारमधील काहीजणांनी महावीर यांना धमकावून त्यांच्याकडील 2 लाख 40 हजार रुपये हिसकावले व ते फरारी झाले. महावीर यांनी यमकनमर्डी पोलिस स्थानकात धाव घेऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. 

या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. दरम्यानच्या काळात महामार्गावरून बेळगाव व कोल्हापूरकडे जाणार्‍या वाहनांच्या सीसीटीव्हीचे फुटेज मिळविण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. याबरोबरच लुटारूंच्या पेहरावाची माहिती महावीर यांच्याकडून पोलिसांनी घेतली आहे. महामार्गावर पोलिसांकडून वारंवार पेट्रोलिंग सुरू असतानाही असे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.