Tue, Dec 10, 2019 13:42होमपेज › Belgaon › दक्षिण कर्नाटकात येत्या २४ तासांत धो-धो!

दक्षिण कर्नाटकात येत्या २४ तासांत धो-धो!

Published On: Apr 30 2019 1:55AM | Last Updated: Apr 30 2019 1:55AM
बंगळूरः वृत्तसंस्था

‘फनी’ चक्रीवादळाच्या परिणामामुळे कर्नाटकातील काही भागात येत्या 24 तासांत विजांचा कडकडाट, जोरदार वार्‍यासह धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क रहावे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (इंडियन मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंट तथा आयएमडी) सोमवारी दिला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून निर्माण झालेल्या ‘फानी’ या चक्रीवादळामुळे तामिळनाडू,आंध्र प्रदेशातील काही भागात जोरदार वादळी वार्‍यासह पाऊस पडला. कमी दाबाचा पट्टा आणि वातावरणातील झालेल्या बदलामुळे भारताच्या दक्षिणेकडील पट्ट्यात ‘फानी’ वादळ घोंगावत आहे.

येत्या 24 तासांमध्ये हे वादळ कर्नाटकातील किनारपट्टी, मलनाडसह दक्षिण भागात या वादळाचा परिणाम होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.सोमवारी  चेन्नईच्या आग्नेय दिशेला 880 कि. मी. दूरवर ‘फनी’चे स्थान होते. ताशी 40 ते 50 कि.मि.वेगाने मंगळवारी  कर्नाटक किनारपट्टीवर हे वादळ धडकेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव बेळगावसह दक्षिण कोकणापर्यंत जाणवणार आहे. म्हैसूर, मंड्या, सकलेशपूर, चिक्कमंगळूर, तुमकूरसह किनारपट्टीवर पावसाची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांत बेळगाव, बंगळूरने 35 ते 39 अंश इतक्या तापमानाचा अनुभव घेतला आहे. चक्रीवादळामुळे तापमानात कमालीची घट होणार आहे. यामुळे उष्म्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळणार आहे. 

याबाबत भारतीय हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक मृत्यृंजय महापात्रा यांनी  किनारपट्टीवरील नागरिकांसह मच्छिमारांनी समुद्रामध्ये जाऊ नये, असे सूचित केले आहे. ‘फनीं’ चक्रीवादळामुळे  कडकडाटासह  विजा कोसळण्याचा धोका असल्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी या काळामध्ये खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे.

दरम्यान,कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कनिष्ठ हवामानतज्ञ एस.एस.एम.गावसकर यांनी पाऊस ,जोरदार वादळ आणि विजांचा कडकडाट हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा परिणाम असून याचा ‘फनी’  चक्रीवादळाशी कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. चक्रीवादळामुळे पाऊस येण्याची शक्यता नाही. पण, चक्रीवादळाभोवती कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जोरदार पावसाची शक्यता आहे.