Sun, Dec 08, 2019 21:47होमपेज › Belgaon › मध्यवर्ती बसस्थानक, तरीही शेड नाही

मध्यवर्ती बसस्थानक, तरीही शेड नाही

Published On: Jun 14 2019 1:51AM | Last Updated: Jun 13 2019 9:48PM
खानापूर : प्रतिनिधी

येथील शिवस्मारक चौकानजीक असलेल्या जुन्या बसस्थानकाच्या ठिकाणी प्रवाशांना बसशेड अभावी गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यापूर्वी याठिकाणी बसशेडची तत्काळ उभारणी करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. मात्र नगर पंचायतीने त्याची कसलीच दखल न घेतल्याने हा पावसाळाही प्रवाशांना चिखलात उभे राहून तसाच काढावा लागणार आहे.

पावसाने हजेरी लावल्याने   छत्रीशिवाय घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. बसशेडअभावी पहिल्याच दिवशी चिंब अंगाने भिजून त्यांना घर गाठावे लागले. मिनी विधानसौधसमोर असलेल्या जुन्या बसस्थानकाला नवीन बसस्थानकाइतकेच महत्व आहे. शहराचा मध्यवर्ती भाग असल्याने प्रवासी व विद्यार्थीवर्ग याठिकाणाहून  बसचा प्रवास करतात. त्याशिवाय सरकारी दवाखान्यातील कर्मचारी, तहसीलमधील कर्मचारी, प्राथमिक शाळा शिक्षक आणि ग्रामीण भागातून बेळगावला ये-जा करणारे प्रवाशांना हे बसस्थानक सोयीचे आहे. त्यामुळे रोज सायंकाळी पाच ते सहाच्या सुमारास दोनशे ते अडिचशे प्रवासी येथून बसला चढतात.

याठिकाणी प्रवाशांना थांबण्यासाठी कसलीच सोय नसल्याने ऊन, पावसाचा सामना करत तसेच ताटकळत थांबावे लागते. यापूर्वी याठिकाणी गर्द झाडे होती. झाडांच्या सावलीत प्रवासी बसची प्रतीक्षा करत असत. मात्र आता बहुतांश झाडे हटविण्यात आली आहेत.  पावसाळ्यात तर वृद्ध, महिला व विद्यार्थ्यांना बस येईपर्यंत भर पावसात ताटकळत थांबताना पावसाची रीपरीप सहन करण्यावाचून दुसरा पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.

याबाबत नगरपंचायतीने त्वरित कार्यवाही हाती घेवून किमान यंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रवाशांना सुरक्षितपणे उभे राहता येईल असे किमान पत्र्याचे निवारा शेड तरी उभारावे अशी प्रवाशांची मागणी होती. मात्र शहरातील मुख्य चौकात आवश्यक असलेली मूलभूत सुविधा पुरविण्याकडे नगरपंचायत प्रशासनाने हलगर्जीपणा दाखविल्याने प्रवाशांनी न. पं च्या नावाने नाराजी व्यक्त केली.