Sat, Dec 14, 2019 05:48होमपेज › Belgaon › फसवून कार विकणारा गजाआड

फसवून कार विकणारा गजाआड

Published On: Jun 04 2019 1:29AM | Last Updated: Jun 04 2019 1:29AM
बेळगाव : प्रतिनिधी

घरासमोर कार लावून उगीच का खराब करता? ती मोठ्या कंपनीत भाड्याने लावून तुम्हाला महिन्याला किमान 40 हजार रूपये भाडे मिळवून देतो, असे सांगत कार घेऊन जायचे. त्यानंतर ती बेळगाव, धारवाडसह बंगळूरसारख्या मेट्रो सिटीत नेऊन विकायची व त्यातून मिळणार्‍या पैशातून चैनी करायची, असा फसवणुकीचा वेगळाच फंडा वापरणार्‍या भामट्याला उद्यमबाग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 49 लाख 50 हजार रूपये किंमतीच्या 9 कार जप्त केल्या. 

शिवकुमार मल्लेशाप्पा माळकन्‍नवर (रामतीर्थनगर, बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे. त्याला यासाठी मदत करणारा व प्रत्यक्षात कार विकणारा संजय कुलकर्णी हा बेळगावचाच भामटा फरारी असून, त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 

22 मे 2019 रोजी मंजुनाथ चंबण्णा अलकट्टी (रा. राणी चन्‍नम्मानगर, उद्यमबाग) यांनी उद्यमबाग पोलिसांत फिर्याद दिली होती. आपली कार भाड्याने लावतो, असे सांगून शिवकुमारने ती नेली. परंतु, तो भाडेही देत नाही आणि कारही परत देत नाही. पोलिसांनी ही वेगळी फिर्याद दाखल करून तपास सुरू केला तेव्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 

कार मालकाला हेरून फसवणूक

शिवकुमार हा भामटा एखाद्याच्या घरासमोर खासगी कार थांबून असेल, तर त्याची ओळख काढून त्याला गाठत होता. उगीच कार घरासमोर लावण्यापेक्षा भाड्याने लावा, माझी बालाजी एन्टरप्राईजेससारख्या अन्य काही मोठ्या कंपन्यांमध्ये ओळखी आहेत. तुम्हाला महिन्याला 40 हजार रूपये भाडे मिळवून देतो. अनेकजण कर्ज घेऊन कार घेतलेली असल्याने 40 हजाराच्या भाड्याला भुलून कार शिवकुमारला देत होते. यावेळी शिवकुमार मुद्रांकावर करारपत्र देखील करत होता. शिवाय कारच्या सर्व कागदपत्रांची एक झेरॉक्स प्रतही मागून घेत होता. 

कार विक्रीचा वेगळाच फंडा 

सदर मालकाकडून जेव्हा तो कार घेत असे, त्यानंतर आठ-दहा दिवसांत तो जुन्या कार विकत घेणार्‍या लोकांना अथवा वैयक्तीकरित्या एखाद्याला गाठत असे. आपण कार विक्री एजंट असून ही कार विकायची आहे, कार मालकाने ती विक्रीसाठी आपल्याला दिली आहे. याची किंमत अंदाजे 5 लाख होईल. तुम्ही मला अ‍ॅडव्हान्स म्हणून अडीच-तीन लाख रूपये द्या, तुम्हाला कारच्या झेरॉक्स प्रती देतो व कारही ठेवून घ्या. जेव्हा पूर्ण रक्कम द्याल तेव्हा तुम्हाला मूळ कागदपत्रे मिळतील. हे सर्व सांगितल्यावर कार आपल्याकडे राहते म्हणून खरेदीदार त्यांना पैसे द्यायचे. इतकी रक्कम मिळाली की शिवकुमार पुन्हा तिकडे फिरकायचाच नाही. यासाठी त्याला संजय कुलकर्णी नामक भामटा मदत करीत होता. 9 पैकी 2 कार संजय कुलकर्णीने बंगळूरमध्ये विकल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची बंगळूरपर्यंतची लिंक पाहता तो आणखीही काही प्रकरणांत संशयित असावा. त्याला ताब्यात घेतल्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. 

बेळगाव, बंगळूरला विक्री

शिवकुमारने गेल्या काही महिन्यांत अशा 9 कार घेतल्या आहेत.  याची किंमत 50 लाखांच्या घरात आहे. यापैकी 7 कार त्याने बेळगाव व धारवाड येथे विकल्या आहेत. दोन कारची बंगळूरला नेऊन विक्री केली आहे. 

विक्रीच्या पैशातून चैनी 

ज्या कार विकून पैसे मिळत होते, त्यातून शिवकुमार हा आयपीएल बेटिंग, अंमली पदार्थांचे सेवन,  दारूच्या व्यसनासह गोव्याला जाऊन  कॅसिनो खेळण्याबरोबरच भरपूर चैनी करत होता. यापूर्वी त्याला टायर चोरी प्रकरणात माळमारुती पोलिसांनी अटक केली होती. दहावी नापास शिवकुमारने फसवणुकीसाठी वापरलेला हा वेगळाच फंडा पाहून पोलिस अधिकारीही अचंबित झाले आहेत. 

भामट्यांपासून सावधान

अनेक मध्यमवर्गीय कर्ज काढून कार घेतात. परंतु, त्यांना दररोज कारची आवश्यकता नसते. अशावेळी असा कोणी आला आणि भाडे मिळवून देतो म्हणाला तर त्याच्या आमिषाला बळी पडणे साहजिकच आहे. त्यामुळे असा कोणी भामटा येऊन कार मागत असेल, तर त्याच्यापासून सावध राहा, असे आवाहन डीसीपी सीमा लाटकर यांनी केले आहे. 
मोठी टोळी कार्यरत  
भाड्याने कार घेऊन त्या गायब करून विकणार्‍यांची मोठी टोळी कार्यरत आहे. तीन वर्षांपूर्वी गोव्यासह विविध ठिकाणांहून भाडोत्री कार आणून त्या परस्पर विक्री केलेल्या 65 कार तत्कालीन सीसीबीचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी जप्त केल्या होत्या. आता पुन्हा अशीच टोळी बेळगावात कार्यरत असल्याचा संशय व्यक्‍त होत आहे. संजय कुलकर्णीला अटक केल्यानंतरच याचा भांडाफोड होणार आहे.