Mon, Dec 09, 2019 11:02



होमपेज › Belgaon › दलित वसाहतीत भाजप कार्यकर्त्यांची रात्र!

दलित वसाहतीत भाजप कार्यकर्त्यांची रात्र!

Published On: Mar 03 2018 1:52AM | Last Updated: Mar 02 2018 8:53PM



खानापूर : प्रतिनिधी

दलित आणि मागासवर्गीय समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या समस्या समजून घेणे महत्त्वाचे आहे. भाजपने त्या दिशेने अनोखा उपक्रम याबवला. दलित वसाहतीमध्ये वास्तव्य करण्याची मोहीम हाती घेतली आहे. भाजपच्या तालुका व स्लम मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी शहरातील शाहूनगरमधील डोंबारी समाज बांधवांशी संवाद साधून त्यांच्या मागासलेपणाची कारणे जाणून घेतली.

शहरातील गलिच्छ वस्ती म्हणून या वसाहतीकडे दुजाभावाने पाहिले जाते. स्वच्छतेचा अभाव, निरक्षरता, आरोग्यविषयक जागृतीचा अभाव आणि शासकीय योजनांची अपुरी माहिती यामुळे शहराचा मध्यवर्ती भाग असूनही ही वसाहत विकासापासून वंचित आहे. आवास योजनेतून प्रत्येकाला स्वतःचे घर मिळाले असले तरी उतार्‍यावर अद्याप नावाची नोंद झाली नसल्याने कोणाच्याही पदरी शौचालयांचे भाग्य मिळाले नाही. परिणामी अस्वच्छतेची समस्या प्रामुख्याने दिसून आल्याने याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी जागा आहे. मात्र आपल्या नावावर नसल्याने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयांचा लाभ मिळविण्यात अडचण ठरत असल्याचे सांगण्यात आले.

राज्य महिला मोर्चाच्या सचिव धनश्री सरदेसाई यांनी महिलांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी वसाहतीमधील महिलांसोबतच रात्रीचे वास्तव्य शाहूनगरमध्ये केले. तत्पूर्वी झालेल्या चर्चेत तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल, प्रमोद कोचेरी, भावेश जांबावलीकर, अभिजीत चांदिलकर, राजेंद्र रायका, राज्य स्लम मोर्चा अध्यक्ष प्रवीण उळागड्डी, उमेश निर्वाणी, काळू थोरवत, शंकर पाटील आदींनी वसाहतीत फेरफटका मारून घरोघरी जाऊन जनतेची हलाखीची परिस्थिती समजून घेतली.

या समाजाच्या महिला अतिशय खडतर आयुष्य जगत असल्याचे निदर्शनास आले. काही जणी गावोगाव फिरून डोक्यावर ओझे घेऊन भांडी विकण्याचा व्यवसाय करतात. बहुतेक महिला प्लास्टिक गोळा करण्याचे काम करतात. शिक्षणाअभावी  बालविवाहाचे प्रमाणही चिंताजनक आहे. या समुदायाच्या मूलभूत सुविधांसाठी पाठपुरावा करण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून करण्याचे आश्‍वासन नागरिकांना देण्यात आले.