Sat, Jul 11, 2020 12:47होमपेज › Belgaon › तलवारीने कापला केक, मिळाला जेलचा शेक 

तलवारीने कापला केक, मिळाला जेलचा शेक 

Published On: Feb 05 2019 1:54AM | Last Updated: Feb 05 2019 12:15AM
बेळगाव ; प्रतिनिधी

प्रत्येकाने वाढदिवस कसा साजरा करावा, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न. केक कापण्यासाठी खरा चाकू वापरायचा की खास केकसाठी बनविलेला प्लास्टिकचा, हे त्या-त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. परंतु, एखाद्याने आपल्या वाढदिवसाचा केक चक्क तलवारीने कापला, तर याची दखल पोलिस घेतात, हे त्या तरुणाला  कारागृहात गेल्यावर समजले. समाजात भय उत्पादन करण्याचा हा प्रकार असल्याचे सांगत पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी केली. 

निखील मुरकुटे (30, रा. जुने गांधीनगर) या तरुणाने आपला वाढदिवस  थाटात साजरा करण्याचे ठरविले. तीन दिवसांपूर्वी त्याने यासाठी आपल्या घरी मित्र मंडळींनाही जमवले. एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता म्हटल्यानंतर मित्र मंडळीही जमलेली. काही तरी हटके करावे म्हणून निखीलने चक्क तलवार बाहेर काढली आणि त्याद्वारे त्याने केक कापला. मित्र मंडळींनी हॅप्पी बर्थ डे म्हटले, मित्रांनी प्रेमाने त्याला केकही भरवला. याचे फोटोसेशन झाले, मोबाईलवर अनेकांनी व्हिडिओ   शुटिंग देखील केले. 

व्हिडिओ व्हायरल अन् अडचण 
वाढदिवस तर झाला. परंतु, त्यानंतर दोन दिवसांनी निखीलने तलवारीने केक कापल्याचे व्हिडिओ मित्रांनी एकमेकांच्या मोबाईलवर शेअर करण्यास सुरवात केली. गंमत म्हणून सर्वजण त्याचा आनंदही लुटत होते. याबाबत जशा सकारात्मक होत्या तशा नकारात्मक प्रतिक्रीया देखील उमटण्यास सुरवात झाल्या. कोणाला वाटत होतं यात इतके गंभीर असे काही नाही. पण, अनेकांना हा प्रकार गंभीर वाटला. तलवारीने केक कापणे म्हणजे एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचाच प्रकार आहे, हेच सोशल मिडियावर अधिक व्हायरल झाले. साहजिकच पोलिसांनाही याची दखल घ्यावी लागली. 

चेहरे लपले पण, तलवार हाती

माळमारुती पोलिसांनी निखीलवर प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. निखीलच्या मित्रांना वाटत होते की इतक्या साध्या गोष्टीचा इतका बाऊ कशासाठी? असे म्हणत ते रात्री कारागृहासमोर जमले  होते.