Tue, Dec 10, 2019 13:51होमपेज › Belgaon › 132 उपनिरीक्षक बनणार सीपीआय

132 उपनिरीक्षक बनणार सीपीआय

Published On: May 27 2019 1:32AM | Last Updated: May 26 2019 8:10PM
निपाणी : मधुकर पाटील

राज्यातील पोलिस स्थानक कक्षेतील पोलिस निरीक्षक (सीपीआय) पदाच्या 132 जागा रिक्‍त आहेत. त्यासाठी बढती प्रकियेस राज्याच्या पोलिस महासंचालिका निलमणी राजू यांनी प्रतीक्षेत असलेल्या 270 पोलिस उपनिरीक्षक (फौजदार) दर्जाच्या अधिकार्‍यांच्या  सर्व्हीस रेकॉर्डची (सेवा पुस्तिका) माहिती मागवली आहे.

महिन्याभरात काम पूर्ण होऊन  रिक्त असलेल्या जागेवर संबंधित अधिकार्‍यांना उपनिरीक्षक पदावरून पोलिस निरीक्षकपदी बढती मिळणार आहे. 270 जणांच्या नावाची यादी प्रसिध्द झाली आहे. तरीही रिक्त असलेल्या केवळ 132 जागांवरच अशांना पहिल्या टप्प्यात संधी मिळणार आहे. इतरांना बढतीसाठी  किमान एक-दोन वर्षे प्रतीक्षेत रहावे लागणार आहे. 

बढती प्रकियेमध्ये निपाणी सर्कलमध्ये चार वर्षात सेवा बजावलेल्या चार पोलिस उपनिरीक्षकांचा  समावेश आहे. दहा वर्षात निपाणी सर्कलमध्ये सेवा बजावून गेलेल्या किमान आठ-दहा पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांना बढती मिळाली आहे. सध्या बढती प्रकियेच्या आदेशपत्रामध्ये समावेश असलेल्या चार पोलिस उपनिरीक्षकांचे अभिनंदन होत आहे.

24 रोजी निलमणी राजू यांनी राज्यातील जिल्हावार कार्यरत असलेल्या सेवाज्येष्ठतेनुसार 270 पोलिस उपनिरीक्षकांच्या सेवा पुस्तिेकेची माहिती मागविली आहे.त्यानुसार बढती मिळणार्‍या सबंधित पोलिस अधिकार्‍यांच्या सेवा पुस्तिकेची स्थानक कक्षेतून माहितीची देवाण-घेवाणी सुरू आहे. 2007 सालच्या बॅचमधील पोलिस उपनिरीक्षकांचा या बढती प्रकियेमध्ये समावेश आहे.

बढती प्रकियेसाठी सर्व्हीस रेकॉर्डची माहिती मागवताना सेवाज्येष्ठतेनुसार संबंधित अधिकार्‍यांची आजतागायत असलेली कामगिरी, गुन्हे तपासणी, वादग्रस्त प्रकरणे मिटविण्यात सहभाग, गंभीर गुन्ह्यांची वेळेत उकल अशा सर्व बाबींची सखोल माहिती मागविली आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार  270 अधिकारी बढतीच्या प्रतीक्षेत असले तरी संबंधित अधिकार्‍यांची आजतागायत उपनिरीक्षक पदावरील कामगिरीही महत्वाची ठरणार आहे.

सर्व्हीस रेकॉर्डच्या आधारे कोणत्याही प्रकारचा ठपका नसलेल्यांना बढती प्रकियेमध्ये सामावून घेतले जाणार आहे.त्यामुळे पहिल्या यादीत बढतीसाठी कोणाची वर्णी लागते, याकडे सबंधित अधिकार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सर्व्हीस रेकॉर्डच ठरणार निर्णायक

बढती प्रकियेसाठी एरव्ही पोलिस अधिकार्‍यांकडून विभागातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शिफारस पत्राचा आधार घेतला जातो. पण या  बढती प्रकियेसाठी सेवा चांगली व प्रामाणिक असलेल्यांनाच सर्व्हीस रेकॉर्ड तपासून बढती पदाची संधी लाभणार आहे.

निपाणीत सेवा बजावलेल्या चार अधिकार्‍यांचा समावेश

राज्याच्या पोलिस महासंचालकांनी बढती प्रकियेसाठी मागवलेल्या सर्व्हीस रेकॉर्ड यादीत निपाणी सर्कलमध्ये सेवा बजावलेल्या आणि सेवेत असलेल्या चार पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. त्यामध्ये सध्या शहर स्थानकात कार्यरत असलेले एच. डी. मुल्ला, गतवर्षी या स्थानकात सेवा बजावलेले सुनील पाटील, अशोक चव्हाण, ग्रामीण स्थानकात साडेतीन वर्षे सेवा बजावलेले मुख्यमंत्री पदकाचे मानकरी निंगनगौडा पाटील यांच्यासह सदलगा स्थानकात सेवा बजावलेले पोलिस उपनिरीक्षक संगमेश दिडगिनहाळ यांचा समावेश आहे.