निपाणी : मधुकर पाटील
शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे. पहिल्या टप्प्यात शिक्षण विभागाने पहिली ते दहावीच्या विद्यार्थांना पाठ्यपुस्तकांचे वाटप वेळेवर केले. पुस्तकाचे वाटप वेळेत झाले, पण आठवी इयत्तेत शिकणार्या विद्यार्थांना सायकली मिळणार कधी मिळणार, असा प्रश्न पालक व विद्यार्थ्यांतून विचारला जात आहे.
आठवीत शिकणार्या विद्यार्थ्यांना सायकली मिळालेल्या नाहीत. त्यामुळे निपाणी विभागातील 52 माध्यमिक शाळांत शिकणार्या 3344 विद्यार्थांना पावसाळ्यात पायपीट करत शाळेला जावे लागत आहे. आठवी इयत्तेत शिकणार्या विद्यार्थांची संख्या ग्रामीण स्तरावर अधिक आहे. ग्रामीण भागातील अनेक गावात रस्त्याची समस्या आहे. अनेक गावातील पाणंद रस्ते सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. शाळेला वेळेत पोहचता येण्यासाठी सरकारने आठवी इयत्तेत शिकणार्या विद्यार्थांना सायकली देण्याचा निर्णय घेतला.
प्रतिवर्षी शिक्षण विभागातर्फे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर महिन्याभरात आठवीत शिकणार्या विद्यार्थ्यांना महिनाभरात सायकलींचे वाटप होते. पण यंदा त्यामध्ये खंड पडला आहे. अद्यापही राज्यस्तरावर कोणत्याच जिल्ह्यात सायकलींचे वाटप झालेले नाही. त्यामुळे आठवीत शिकणार्या विद्यार्थांची गैरसोय होत आहे. निपाणी शैक्षणिक विभागात 52 माध्यमिक शाळा आहेत. आठवी इयत्तेत शिकणार्या विद्यार्थांची संख्या 1626 मुले व 1718 मुली अशी आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा आठवीत शिकणार्या विद्यार्थांची संख्येत घट झाली आहे. गतवर्षी 3380 विद्यार्थी होते. शासनाने अनेक लाभदायी उपक्रम व योजना राबविल्या आहेत. पण त्यांची वेळेत अंमलबजावणी होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. याबाबत येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधला असता सायकलीसाठी निपाणी विभागाचा विद्यार्थी संख्येनुसार अहवाल जिल्हा पातळीवर पाठविला असल्याचे सांगण्यात आले. यंदा सायकली कधी मिळणार, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.
निपाणी विभागात 52 माध्यमिक स्कूलमध्ये आठवीत शिकणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा अहवाल सायकल योजनेसाठी जिल्हा पातळीवर पाठवून दिला आहे. पण अद्यापही सायकली वितरणाबाबत निविदा निघालेल्या नाहीत. महिनाअखेरपर्यंत निविदा निघून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थांना सायकलींचे वाटप होईल.
-के.रामनगौडा, गटशिक्षणाधिकारी,निपाणी तालुकाप्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थांना शिक्षण खात्याकडून आवश्यक पाठ्यपुस्तकांचे वाटप वेळेत झाले आहे. तिसरीच्या पुस्तकात चुका आढळून आल्याने सुधारित पुस्तक वाटप लवकरच होणार आहे. निपाणी विभागात पुस्तक वाटपाचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे.
व्ही.के.सनमुरी, शिक्षण संयोजक,निपाणी तालुका