बेळगाव : प्रतिनिधी
रेल्वेत बॉम्ब ठेवल्याचे निनावी पत्र पाठवण्यात आल्यामुळे शुक्रवारी रात्री बेळगाव रेल्वेस्थानकावर वास्को-निजामुद्दीन रेल्वेची तपासणी करण्यात आली. मात्र, रेल्वे गाड्यांमध्ये स्फोटके आढळून आली नाहीत. त्यामुळे प्रवाशांसह पोलिसांनीही सुटकेचा निश्वास सोडला.
रात्री 9 च्या सुमारास वास्कोहून दिल्लीकडे जाणार्या निजामुद्दीन एक्स्प्रेसची तपासणी करण्यात आली. पोलिस उपायुक्त नारायण बरमनी यांच्या नेतृत्वाखाली बॉम्बशोधक पथकाकडून ही तपासणी झाली.
रात्री 9 च्या सुमारास बॉम्बशोधक पथकाच्या पाच कर्मचार्यांसह आठ ते दहा पोलिस रेल्वेस्थानकावर दाखल झाले. त्यामुळे प्रवाशांत घबराट पसरली होती. पोलिसांनी कचरा डबे, पेट्या, जनरल डबे तसेच स्थानकावरील पूर्ण रेल्वे मार्गाची तपासणी केली. त्यासाठी रेल्वे सुमारे अर्धा तास थांबविण्यात आली होती. प्रवाशांच्या संशयास्पद बॅगाही तपासण्यात आल्या.
कारण काय?
बेळगावमधून बंगळूरला गृहखात्याला एक निनावी पत्र पाठवण्यात आले असून, त्यात बेळगाव रेल्वेस्थानकात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. ते पत्र पोहोचताच गृहखात्याने बेळगाव पोलिसांना तपासणीची सूचना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी रात्री ही तपासणी केली. त्यात काहीच आक्षेपार्ह आढळले नसल्यामुळे रेल्वेला पुढे जाऊ देण्यात आली. साडेनऊच्या सुमारास रेल्वे दिल्लीकडे रवाना झाली.
अॅलर्टचाही परिणाम
ईस्टर डे म्हणजेच गेल्या रविवारी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दक्षिण भारतातील शहरांमध्येही अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीलंकेतील स्फोटांमध्ये कर्नाटकातील 10 जणांचा बळी गेला आहे. त्यानंतर बंगळूर आणि म्हैसूर ही पर्यटनस्थळे दहशतवाद्यांच्या यादीत असण्याची शक्यता असल्यामुळे या दोन्ही शहरांत हाय अॅलर्ट जारी आहे. बेळगावात अॅलर्ट जारी नसला तरी बेळगाव संवेदनशील असल्याने रेल्वेमध्ये स्फोट घडवून तणाव माजवण्याचा कट असू शकतो, ही शक्यता गृहित धरून तपासणी करण्यात आली.