Mon, Nov 20, 2017 17:22होमपेज › Belgaon › बेळगावः सीमालढा आणखी किती वर्षे?

बेळगावः सीमालढा आणखी किती वर्षे?

Published On: Nov 15 2017 1:46AM | Last Updated: Nov 15 2017 6:39AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

संपूर्ण सीमाभागात गेल्या 61 वर्षांपासून महाराष्ट्रात सामील होण्यासाठीचा लढा लढला जात आहे. यात आता चौथी पिढी अग्रेसर होताना दिसते आहे. हे चिन्ह आश्वासक असले तरी आणखी किती वर्षे हा संघर्ष चालू ठेवावा लागणार, याचे उत्तर कोणा नेत्याकडे नाही आणि न्यायालयही तारखांवर तारखा टाकत चालले आहे. यामुळे चौथी...पाचवी अशा किती पिढ्यांनी कर्नाटकात जुलूम सहन करत राहायचे, हा मुद्दा आता ऐरणीवर येणे साहजिक आहे. 

वाचा : बेळगाव : चेतविला अंगार, येऊ दे नवी धार!

वाचा : बेळगावः ‘सुवर्णसौध’मध्ये घुमला मराठी आवाज

सोमवारी यशस्वी झालेल्या महामेळाव्यात याचा पुसटसा अंदाज म. ए. समिती आणि नेत्यांना आला असेल. सहभागी सीमाबांधवांनी काही फलक हाती घेऊन लक्ष वेधले होते. यातून विशेषत: महिलांनी एक फलक घेतला होता. तो पुरेसा बोलका म्हणायला हवा. 

‘मुंडेदादा....एन. डी. पाटलांचे वय बघा हो. त्यानंतरचे काय? तुम्ही तर तप्‍त गोळा आहात!’ 

या फलकातला आशय आणि अपेक्षा दुर्लक्षित करण्याजोगी नाही. महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांना उद्देशून हा फलक होता. ते आले नसले तरी महाराष्ट्रात राहून तप्‍त गोळ्यासारखे सक्रिय व्हावे. प्रा. एन. डी. पाटील यांची सारी हयात सीमालढ्यासाठी गेली. आजही ते त्वेषाने कर्नाटकी अन्याय आणि जुलूमशाहीविरोधात उभे राहतात. त्यांच्या शब्दांना धार आणि महाराष्ट्रात मान आहे. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकवटून हल्‍लाबोल करायला हवा. पण असे क्‍वचितप्रसंगी दिसून आले. तेथील भाजप नेते सीमालढ्याला पाठिंबा देतात, मग महामेळाव्याला स्थानिक तर सोडाच महाराष्ट्रातील नेतेही फिरकले नाहीत. त्यांचा पाठिंबा बोलघेवडा आणि मतांवर डोळा ठेवून आहे, हे सीमावासीय जाणून आहेत. सीमाभाग महाराष्ट्रात आल्याशिवाय बेळगावात पाय ठेवणार नाही, अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. 1983 मध्ये ते बेळगावच्या सभेत आले आणि ती गाजवली. पण त्यानंतर ते आले नाहीत. 

वाचा : थापा बंद करा; बेळगावात चिमुकल्याचा फलक लक्षवेधी

या महामेळाव्यात त्यांचे नेते, शिवसैनिक दिसले नाहीत. बाळासाहेबांना पोटतिडीक होती. पण आताचे नेतृत्व बेळगावात का आले नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. प्रा. एन. डी. पाटील यांच्यानंतरचा सर्वसमावेशक आणि शब्दांना धार असलेला नायक कोण? सीमावासीयांनी कोणाकडे आशेने पाहावे? सीमाभागातील मराठी बांधल लढत आलेच नाहेत. त्यांना कणखर नेतृत्व हवे आहे. त्यांचे लक्ष महाराष्ट्राच्या कृतिशीलतेकडे लागले आहे. सीमाबांधवांचा अपेक्षाभंग होता कामा नये. सीमाभाग महाराष्ट्रात विलीन होईल, पण इथल्या मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन...संवर्धन करण्यासाठी तरी संघर्ष करायलाच हवा.