होमपेज › Belgaon › महामेळाव्याने अधिवेशन गरम

महामेळाव्याने अधिवेशन गरम

Published On: Nov 15 2017 1:46AM | Last Updated: Nov 14 2017 11:49PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटकी प्रशासनाचा बंदी आदेश झुगारून मराठी भाषिकांनी महामेळावा यशस्वी केला. पोलिसांच्या दडपशाहीला न जुमानता मराठी भाषिकांनी महामेळाव्याला हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शविली. या उलट विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची शाही थाटात तयारी करण्यात आली होती. मात्र, अधिवेशनाचे कामकाज कोरम अभावी तहकूब करण्याची वेळ विधानसभा सभापतींवर आली.

टिळकवाडी येथील महामेळाव्याला हजारो मराठी भाषिक उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिले. मात्र, 224 आमदारांपैकी केवळ 18 आमदार सोमवारी सकाळी सदनात उपस्थित होते. या 18 जणांत भगवे फेटे धारण केलेले म. ए. समितीचे आमदार सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. कोरम अभावी कामकाज तहकूब करण्याची वेळ सभापतींवर आली. याचवेळी बेळगावात मराठी भाषिकांचा हुंकार सुरू होता.

महामेळावा यशस्वीरित्या पार पडला. महाराष्ट्रातील नेत्यांनी प्रवेश बंदी झुगारुन आपला स्वाभीमान प्रकट केला. महामेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे पाहून चेकाळलेल्या काही मुठभर कन्नडिगांनी थयथयाट केला, कन्नड प्रसार माध्यमांनी थयथयाट करणार्‍या कन्नडिगांची तळी उचलून धरली. कन्नड न्यूज चॅनेलवर बेताल चर्चा सुरू झाली. महामेळाव्याच्या यशामुळे चेकाळलेल्या कन्नड नेत्यांनी म. ए. समिती आणि महाराष्ट्रातील नेत्यांविरोधात गरळ ओकली.

महामेळाव्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. अनेक प्रसार माध्यमांनी महामेळाव्याला हजारोंची उपस्थिती असताना विधानसभेचे कामकाज कोरम अभावी तहकूब करण्यात आल्याबद्दल कर्नाटकी नेत्यांवर सडकून टीका केली.

प्रसार माध्यमांमध्ये महामेळाव्याला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अधिकार्‍यांमध्ये महामेळाव्याचीच चर्चा सुरू होती. हिवाळी अधिवेशनाचे काम पहिल्याच र्दिीवशी गारठले.मात्र, महामेळाव्याच्या यशाची धग अधिवेशनात दिसली.