Thu, Dec 05, 2019 20:46होमपेज › Belgaon › बेळगाव, चिकोडीची प्रगती 

बेळगाव, चिकोडीची प्रगती 

Published On: Apr 16 2019 2:15AM | Last Updated: Apr 15 2019 11:55PM
बेळगाव : प्रतिनिधी

बारावी निकालात यंदा बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याने किंचित प्रगती साधली आहे. 34 जिल्ह्यांच्या यादीत बेळगाव शैक्षणिक जिल्हा 28 व्या तर चिकोडी 25 व्या स्थानी आहे.  गेल्या वर्षी बेळगाव 29 व्या क्रमांकावर तर चिकोडी शैक्षणिक जिल्हा 32 व्या क्रमांकावर होता. यंदा बेळगाव जिल्ह्याचा निकाल 56.18 टक्के असून, चिकोडीचा निकाल 60.86 टक्के आहे. राज्याचा निकाल 61.18 टक्के लागला आहे.

गेल्या वर्षी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल 54.28 टक्के होता.  यंदात त्यात सुमारे 2 टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे बेळगावने एक स्थानाची प्रगती करून 29 वरून 28 वा क्रमांक पटकावला. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 34  केंद्रांतून 23 हजार 994 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 

बायोलॉजी कठीण

विज्ञान विभागातील जीवशास्त्र (बायोलॉजी) विषयात अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. पेपर जड होता, अशी तक्रारही परीक्षा मंडळाकडे विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र, परीक्षा मंडळाने सारे प्रश्‍न अभ्यासक्रमांतीलच असल्याचे सांगून ग्रेस मार्क नाकारले होते. 

यंदा  लोकसभेच्या निवडणुकीमुळे परीक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या. निकालही लवकर जाहीर करण्यात आला आहे. यंदा परीक्षा मंडळाने सीईटीआधीच निकाल जाहीर केला. 
शिक्षण खात्याच्या वेबसाईटवर  निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मोबाईलवर निकाल पाहिला. मात्र महाविद्यालयातून मंगळवारी (दि.16)  नोटीस बोर्डावर निकाल जाहीर करण्यात येईल, असे जिल्हा पदवीपूर्व शिक्षण खात्याचे अधिकारी एस. एस. हिरेमठ यांनी सांगितले.

पुरवणी परीक्षा जूनमध्ये

जूनमध्ये पुरवणी परीक्षा होत असून त्यासाठी अर्जाची अंतिम मुदत 30 एप्रिल आहे. अनुत्तीर्ण झालेल्यांना एका विषयासाठी 140 रु., दोन विषयांसाठी 270, तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांसाठी 300 रु. शुल्क भरावे लागेल. फेरमूल्यमापनाकरिता स्कॅनिंग प्रत मिळवण्यासाठी 17 ते 29 एप्रिलपर्यंत मुदत असेल. उत्तरपत्रिकेची स्कॅन केलेली प्रत डाऊनलोड करण्यासाठी 27 एप्रिल ते 6 मे पर्यंत, फेरमूल्यमापन अर्जासाठी 29 एप्रिल ते 8 मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. स्कॅनिंग प्रत मिळवण्यासाठी प्रति विषयाकरिता 530 रु. शुल्क असेल. फेरमूल्यमापनासाठी 1670 रु. शुल्क आकारण्यात येणार आहे.

निकाल मोबाईलवरच

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी  सायबर कॅफेंचा आधार घेतला. मात्र बहुतांशी विद्यार्थ्यांनी मोबाईलवरच निकाल तपासला. काही विद्यार्थी एका, तर अनेक विद्यार्थी दोन विषयांत नापास झाले आहेत. त्यांच्या चेहर्‍यांवर नैराश्य जाणवत होते.

बेळगाव येथील विद्यार्थी साईश मेंडके राज्यात चौथा

बारावीच्या परीक्षेत जीएसएस कॉलेजचा विद्यार्थी साईश मेंडके याने विज्ञान शाखेतून 600 पैकी 591 (98.50 टक्के)  गुण घेऊन राज्यात चौथा येण्याचा मान मिळविला आहे. तो जिल्ह्यात पहिला आला आहे. 

वाणिज्य विभागात गोगटे कॉलेजची विद्यार्थिनी रचेल पिंटो ही 587 (97.83) गुण घेऊन जिल्ह्यात पहिली आली आहे. तर, कला विभागात लिंगराज महाविद्यालयाची विद्यार्थिनी  पल्लवी कोरी 579 (96.50 टक्के) गुण घेऊन जिल्ह्यात पहिली आली आहे. साईश रोज दहा ते बारा तास अभ्यास करीत होता.  पुढे अभियंता होणार आहे, असे त्याने ‘पुढारी’ला सांगितले. वडील श्रीकांत हे नुकसान भरपाईचे सर्व्हेयर म्हणून काम करतात. आई सुजाता गृहिणी आहे.