Wed, Oct 16, 2019 10:08होमपेज › Belgaon › बेळगावच्या व्यापार्‍याचा 50 लाखांचा ऐवज लुटला

बेळगावच्या व्यापार्‍याचा 50 लाखांचा ऐवज लुटला

Published On: Nov 08 2018 1:24AM | Last Updated: Nov 08 2018 1:24AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगावच्या एका व्यापार्‍याला मुंबईजवळ सायन-पनवेल महामार्गावर अज्ञात दरोडेखोरांनी डोळ्यात मिरची पूड टाकून बेदम मारहाण करत 50 लाखांचा ऐवज लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. 50 लाखांच्या सोनसाखळ्या, एक मोबाईल आणि 10 हजार रुपये असा लुटलेला ऐवज आहे. घटनेने बेळगावच्या व्यापार्‍यांत  खळबळ उडाली आहे. 
दरम्यान, दरोडेखोर काशी एक्स्प्रेसने पळून गेल्याच्या शक्यतेने जळगाव पोलिसांनी काशी एक्स्प्रेसला 120 पोलिस व अधिकारी यांनी मंगळवारी वेेढा दिला, मात्र दरोडेखोरांचा सुगावा लागला नाही. व्यापारी संतोश मोतीलाल मुरकुंबी (वय 44, रा. नार्वेकर गल्ली, शहापूर, बेळगाव) हे सोमवारी (दि. 5) सायन-पनवेल या महामार्गावर मॅक्डोनाल्ड हॉटेलमध्ये जेवण करुन जवळच्या बसथांब्यावर बेळगावकडे जाण्यासाठी थांबले होते. त्यांच्याकडे 50 लाख 55 हजार रुपयांच्या 20 सोन्याच्या साखळ्या व रोख 10 हजार  होते. अचानक त्यांच्यासमोर एक पांढरी कार येऊन थांबली. आम्ही पुण्याच्या दिशेने चाललोय, येताय का, अशी विचारणा कारमधील दरोडेखोरांनी केली. मुरकुंबींनी होकार देत कारमध्ये प्रवेश केला. कारमध्ये आधीपासूनच चौघे जण होते. 
कार मार्गस्थ झाली. मात्र पुण्याच्या दिशेने न जाता ती कार कळंबोली सर्कल येथून गोव्याच्या दिशेने जाऊ लागली. त्यावेळी संतोष यांनी ‘पुण्याकडे न जाता गोव्याच्या दिशेने का चाललात’ असे विचारताच, ‘पुढे मित्राला सोडून परत येऊ’, अशी थाप दरोडेखोरांनी मारली.  मात्र कार काही अंतरावर गेल्यावर संतोष यांच्या डोळ्यात चटणीपूड टाकून त्यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्या अंगावरील जॅकेटच्या खिशातील 20 सोनसाखळ्या, दहा हजार रोख व मोबाईल काढून घेतला. त्यानंतर संतोष यांना कारबाहेर ढकलून दरोडेखोर पसार झाले. याबाबतची तक्रार कळंबोली पोलिस स्थानकात नोंद झाली आहे.

....अन 120 पोलिसांंचा रेल्वेला वेढा 

दरोेडेखोर मंगळवारी मुंबई-वाराणशी एक्स्प्रेसमधून रवाना झाल्याची खबर मिळताच, पनवेल पोलिसांनी जळगाव पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर चाळीसगाव रेल्वे स्थानकावर दु. 1 वाजता अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी तपासणी केली. त्यानंतर ही रेल्वे दुपारी 2 वाजता जळगाव पोचताच उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी 60 जणांचे पथक आणि रेल्वे पथकासह संयुक्त तपासणी केली. या स्थानकावर 10 मिनिटांचा थांबा असून तपासणी पूर्ण न झाल्याने या पोलिस पथकाने रेल्वेमधून भुसावळपर्यंत प्रवास करत रेल्वेची छाननी केली. मात्र दरोडेखोरांचा सुगावा लागला नाही.

मुंबई पोलिसांंची सतर्कता

तक्रार होताच कळंबोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी चक्रे फिरवली. चौकशीअंती दरोडेखोर लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर या काशी एक्स्प्रेसमध्ये कल्याण स्थानकावर चढल्याचा संशय आला. त्यानंतर दरोडेखोर मुंबईपासून 500 कि.मी.वर असलेल्या जळगावपर्यंतच पोचल्याचा अंदाज बांधून जळगावशी संपर्क साधला. त्यानंतर पुढचा तपास सुरू झाला.