Thu, Jul 16, 2020 00:18होमपेज › Belgaon › ‘स्मार्ट सिटी’त बेळगाव 41 वे

‘स्मार्ट सिटी’त बेळगाव 41 वे

Published On: Feb 11 2019 1:16AM | Last Updated: Feb 11 2019 12:06AM
बेळगाव : प्रतिनिधी

स्मार्ट सिटीची विकासकामे राबवण्यात 100 शहरांच्या यादीत बेळगाव 41 व्या स्थानावर आहे. या यादीत नागपूर पहिल्या स्थानी आहे.

केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अंतर्गत 100 शहरांची निवड 2015 साली केली. त्यात बेळगाव शहराचा समावेश झाला. स्मार्ट सिटीमधील शहरांच्या विकासकामाचा सर्व्हे केल्यानंतर ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. दुसर्‍या क्रमांकावर भोपाळ आहे. हुबळी-धारवाड 42 व्या क्रमांकावर आहे.

बेळगाव शहर विकास कामे राबविण्यात पिछाडीवर पडले आहे, हे स्मार्ट निधी खर्च करण्यावरूनही स्पष्ट होते. बेळगावात 58 वॉर्डात विकासकामे राबविण्यात आली आहेत. नगरसेवकांनी रस्ते, गटारी यावरच निधी खर्च केला आहे. उर्वरीत कामे अजून स्मार्ट सिटी अंतर्गत पूर्ण व्हायची आहेत. 

शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत विकास करण्यासाठी 400 कोटीचा निधी आला होता. तो निधी विकासकामे राबविण्यासाठी खर्च करता आलेला नाही. त्यामुळे हा निधी बँकेत ठेव स्वरुपात ठेवण्यात आला आहे. त्याच्या व्याजापोटी 40 कोटी रक्कम यंदा जमा झाली आहे. 

बेळगावात एकून 54 कामे  स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु करण्यात आली आहेत. त्यापैकी केवळ 17 कामे पूर्ण झाली असून 23 कामे ठेकेदारांकडून विविध कारणांनी रेंगाळली आहेत. त्यामुळे बेळगावात स्मार्ट सिटी अंतर्गत कामे धिम्या गतीने सुरु आहेत.

भूमिगत वीजवाहिन्या, ठरावीक परिसरात वाय-फाय झोन, अत्याधुनिक बसस्थानक, पदपथ, सायकल ट्रॅक अशी कामे स्मार्ट सिटी योजनेतून प्रस्तावित आहेत. त्यापैकी काही कामे बेळगावात सुरू झाली आहेत.मात्र बहुतांशी रेंगाळली आहेत. 

कामे राबवण्यात होणारी दिरंगाई टीकेचे कारण बनली आहे. त्यामुळे कामांना गती देण्यासाठी स्मार्ट सिटी लि. या नावे वेगळी कंपनीही बनवण्यात आली. पण त्या कंपनीला व्यवस्थापकीय संचालक वेळेवर मिळेनासा झाला आहे. शिवाय हे पद म्हणजे संगीतखुर्ची झाली आहे. ते पद कधी महापालिका आयुक्तांकडे दिले जाते, तर कधी जिल्हाधिकार्‍यांकडे तर कधी त्या पदासाठी स्वतंत्र अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात येते.
सध्या स्मार्ट सिटीची कामे राबवण्याची जबाबदारी व्यवस्थापकी संचालक झियाउल्ल एस. यांच्यावर आहे. पण डिसेंबर महिन्यात ते निवडणूक निरीक्षक म्हणून छत्तीसगढला गेले होते. त्यावेळीही कामे रेंगाळली होती. 
स्मार्ट सिटीवर खासगी सल्लागार नेमणुकीवरुनही बेळगावात वाद झाला होता. महापौरांनी शिफारस केलेली नगरसेवकांची नावे सोडून, भलत्यांनाच महापालिकेतर्फे सल्लागार म्हणून नेमण्यात आले होते. सत्ताधारी गटाने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पुन्हा दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे बेळगावची निवड स्मार्ट सिटी योजनेत होऊन तीन वर्षे उलटली तरी काम मात्र अपेक्षित वेगाने सुरू झालेले नाही.