Sun, Dec 08, 2019 21:47होमपेज › Belgaon › मंत्रिमंडळ विस्ताराआधीच आघाडीत बिघाडी शक्य!

मंत्रिमंडळ विस्ताराआधीच आघाडीत बिघाडी शक्य!

Published On: Jun 10 2019 1:30AM | Last Updated: Jun 10 2019 12:41AM
बेळगाव : प्रतिनिधी

काँग्रेस-निजद आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्याऐवजी केवळ रिक्‍त जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे काँग्रेसमधील दोन डझनपेक्षा अधिक इच्छुकांमध्ये नाराजी आहे. यावेळी मंत्रिपद न मिळाल्यास राजकीय भविष्याबाबत निर्णय घेण्याची तयारी काहीजणांनी केली आहे. यामुळे सरकार कोसळण्याचे संकेत मिळाले आहेत.

बुधवारी मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्‍चित करण्यात आली आहे. मात्र, त्याआधीच आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची चिन्हे आहेत. सत्तेत आल्यानंतर केवळ प्रभावी नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. महामंडळ, प्राधिकरणांबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. नाराज असणार्‍या काँग्रेस आमदारांकडे त्या पक्षातील वरिष्ठांकडून दुर्लक्ष केले जात आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी त्यांच्याशी चर्चा करून समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला; पण स्वत:च्याच पक्षाचे वरिष्ठ नेते दुर्लक्ष करत असल्याने काँग्रेस आमदारांनी त्यांच्यासमोर नाराजी व्यक्‍त केली.

वरिष्ठ नेत्यांच्या धोरणामुळेच काँग्रेस नेते रामलिंगारेड्डी, रोशन बेग, बी. सी. पाटील आदींनी जाहीर विधाने केली. यामुळे पक्षांतर्गत वाद वाढल्याचे दिसून आले आहे. आता मंत्रिमंडळ विस्तारावेळी संधी मिळाली नाही तर उलथापालथीची शक्यता आहे.