Sun, Dec 08, 2019 21:52होमपेज › Belgaon › मधमाशीला मिळणार राज्य कीटकाचा दर्जा

मधमाशीला मिळणार राज्य कीटकाचा दर्जा

Published On: Jun 27 2019 1:31AM | Last Updated: Jun 26 2019 10:53PM
बेळगाव : प्रतिनिधी

नैसर्गिक परागीभवनाच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या मधमाशीला ‘राज्य कीटका’चा दर्जा मिळणार आहे. जैववैविध्य मंडळाने याबाबतचा प्रस्ताव सरकारला पाठवला आहे.

मंडळाची नुकतीच बैठक झाली. यावेळी वन्यजीव तज्ज्ञांचे मत जाणून घेण्यात आले. नैसर्गिक आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असणार्‍या मधमाशांचे संवर्धन आवश्यक आहे. शेतकर्‍यांसाठी हा कीटक लाभदायक आहे. जैववैविध्य मंडळाच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सरकारकडून राजपत्रित अधिसूचना जारी होणार आहे.

याआधी राज्याचा प्राणी, पक्षी, फुलपाखरु घोषित करण्यात आले आहे. मधमाशीचे नैसर्गिकदृष्ट्या महत्त्व ओळखून सरकारने याआधीच काही योजना लागू केल्या आहेत. त्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे. हा उद्योग फायदेशीर असून अनेकजण लाभ घेत आहेत.

जंगलतोडीमुळे वन्यप्राण्यांसह काही महत्त्वाच्या कीटकांवर संकट ओढवले आहे. त्यापैकी एक मधमाशी आहे. वाढत्या शहरीकरणात मधमाशांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. आज अनेक शहरांत मधमाशा हद्दपार झाल्या आहेत. यामुळे परागीभवनाची नैसर्गिक प्रक्रिया मंदावली आहे. मधमाशीला राज्य कीटकाचा दर्जा मिळाल्यास तिचे जतन करण्याची योजना व उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. याविषयी जनतेत जागृती केली जाणार आहे. मधमाशांच्या वसाहती असणार्‍या ठिकाणी त्यांच्या रक्षणासाठी विविध उपाययोजना आखल्या जाणार आहेत.

बदाम, स्ट्रॉबेरी, काकडी, कोबी, लिंबूच्या जातीतील फळे, कोथिंबीर, काकडी, गाजर, कांदा, सूर्यफूल, मोहरी, लवंग यांसह शेकडो झाडांचे परागीभवन करण्यात मधमाशी महत्त्वाची भूमिका बजावते.

2016 मध्ये राज्य शासनाने सदर्न विंग बटरफ्लायला राज्य फुलपाखरु म्हणून घोषित केले. त्याआधी हत्तीला राज्य प्राणी, नीळकंठला (इंडियन रोलर) राज्य पक्षी म्हणून घोषित केले आहे. आता राज्य कीटकही लवकरच घोषित केला जाणार आहे.

मधमाशांचा उपयोग

मधमाशीमुळे अनेक झाडांचे परागीभवन होते. मधमाशी पोळे बांधतात. हे पोळे मेणाचे असते. याचा वापर सौंदर्य प्रसाधनात केला जातो. मधाचा वापर प्राचीन काळापासून औषधांसाठी केला जातो. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये मध वापरले जाते.