Thu, Dec 05, 2019 20:47होमपेज › Belgaon › बसव कल्याणमध्ये कुणाचे कल्याण?

बसव कल्याणमध्ये कुणाचे कल्याण?

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 8:59PMगुलबर्गा : गुरय्या रे स्वामी

बाराव्या शतकातील महान क्रांतीकारक महात्मा बसवेश्वरांंची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या बसवकल्याण (जि. बीदर) मतदार संघात भाजप, निधर्मी जनता दल व काँग्रेस अशी तिरंगी लढत होत आहे.  हा मतदार संघ निधर्मी जनता दलाचा गड मानला जातो. 2008 ची निवडणूक वगळता 1989 पासून इथे जनता दलच विजयी झाले आहे. 

यंदा आमदार मल्‍लिकार्जुन खुबा यांनी निजद सोडून भाजपात प्रवेश केल्याने निजदने या मतदार संघात माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांचे विश्‍वासू सहकारी माजी गृहमंत्री व मराठा समाजाचे जेष्ठ नेते पी.जी.आर.सिंदिया यांना  उतरवले आहे. त्यामुळेच या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या बी.नारायणराव यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिली  आहे.

2004 व 2013 साली निजदकडून विजयी झालेल्या मल्‍लिकार्जून खुबा यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. निर्णयाने या मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.मागील वर्षी राज्यात झालेल्या लिंगायत चळवळीमुळे लिंगायत मतांमध्ये फूट पडल्याचे दिसून येते. खुबा लिंगायत समाजाचे आहेत.परंतु त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने लिंगायत समाजाच्या मतविभागणीचा फटका त्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सिंदिया मराठा समाजाचे नेते असून मराठा समाजासह येथील मुस्लिम,दलित आणि काहीं लिंगायत मते खेचण्यात यशस्वी झाल्यास त्यांना सकारात्मक निकाल मिळेल. काँग्रेस आणि निजदचे उमेदवार मतदारसंघाबाहेरचे असल्याने भाजपचे खुबा येथून निवडून येतील, असे भाजप समर्थकांचे म्हणणे आहे. परंतु राजकारणात आतापर्यंत जात महत्वाची ठरल्याचेच चित्र दिसून येते. 

मागील विधानसभा निवडणुकीत कजपतर्फे निवडणुका लढविलेल्या मल्‍लम्मा पाटील-अटूर यांचे पती बसवराज पाटील-अटूर यांनी निधर्मी जदला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे लिंगायत समाजातील अनेक मते निजदला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेस उमेदवार बी. नारायणराव यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. पण ते सुमारे दहा हजार मतांनी पराभूत झाले होते.यंदा पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत.  या मतदार संघातून आतापर्यंत निवडून गेलेले नेते कोणत्याही एका पक्षाशी एकनिष्ठ राहिले नाहीत.

निजदची बाजू सध्याच्या राजकीय परिस्थितीत भक्कम असून सिंदिया प्रचारात आघाडीवर आहेत. मराठा,मुस्लिम,दलित आणि लिंगायतसह इतर समाजाचा त्यांना पाठिंबा मिळत असल्याने त्यांच्या विजयाच्या आशा पल्‍लवित झाल्या आहेत. भाजपतर्फे नरेंद्र मोदी बी.एस.यडियुरप्पा जोरदार प्रचार करत आहेत. सर्वच उमेदवार घरोघरी भेटीवरच अधिक भर देत आहेत.पी.जी.आर. सिंदिया यांची ही लढाई अस्तित्वाची व अखेरची आहे .देवेगौडा आणि कुमारस्वामी यांनी जातीय समीकरणाचा विचार करूनच हा डाव मांडला आहे. यात ते यशस्वी होतात काय हे शेवटी मतदारच ठरवतील.