Sun, Jan 19, 2020 00:09होमपेज › Belgaon › ‘हॅट्ट्रिक’साठी भाजपची धडपड

‘हॅट्ट्रिक’साठी भाजपची धडपड

Published On: Apr 14 2018 1:52AM | Last Updated: Apr 14 2018 1:44AMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. यामुळे इच्छुकांची धावपळ सुरू झाली असून रायबाग विधानसभा मतदार संघातील हालचालीना वेग आला आहे. भाजपकडून हॅट्रीक साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तर काँग्रेसने भाजपच्या ताब्यातील हा मतदारसंघ खेचून आणण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे.

विधानसभा मतदारसंघाची 2008 मध्ये पुनर्रचना करण्यात आली. त्यानंतर हा राखीव मतदारसंघ अस्तित्वात आला. यामुळे सुरुवातीच्या काळात काँग्रेसच्या विचारसरणीचा आणि माजी मंत्री व्ही. एल. पाटील यांच्या विचाराचा पगडा असणारा मतदार संघ भाजपने पटकावला.गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपचे आ. दुर्योधन ऐहोळे यांनी याठिकाणी विजय मिळविला. 2013 च्या निवडणुकीत त्यांना निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले. याठिकाणी अपक्ष उमेदवार प्रदीप माळगी यांना केवळ 829 इतक्या अत्यल्प मतांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यावेळी सुकुमार किरणगी यांनी 30 हजार 43 मते मिळविली होती.

Tags :BJP's struggle, for 'hatrick,belgaon news

 

गेल्या पाच वर्षांत राजकीय समीकरणे बदलली आहेत. प्रदीप माळगी यांनी काँग्रेसचा हात धरला आहे. यामुळे काँग्रेसच्या गोट्यात उत्साह संचारला आहे. भाजपला चितपट करण्याचे मनसुबे काँग्रेसकडून आखण्यात येत आहेत.
काँग्रेसकडून प्रदीप माळगी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी माळगी यांनी विधानपरिषद सदस्य विवेकराव पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न चालविले आहेत. तर मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची खिंड लढविलेले सुकुमार किरणगी, महावीर मोहिते यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत. यामध्ये प्रदीप माळगी यांचे पारडे जड असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी प्रदीप माळगी हे दुर्योधन ऐहोळे यांना कडवी झुंज देण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपला विजय मिळविण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागणार आहे. काँग्रेसने इच्छुकांचे समाधान केल्यास ते भाजपची अपेक्षित हॅटट्रिक रोखण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मतदारसंघात पूर्वीपासून माजी आ. व्ही. एल. पाटील यांना मानणारा खास वर्ग आहे. तो नेहमीच काँग्रेसला पसंती देत आला आहे. मात्र, मध्यंतरी व्ही. एल. पाटील यांच्या कुटुंबामध्ये झालेल्या मतभेदामुळे काहींनी भाजपला पसंती दिली. ती भाजपच्या पथ्यावर पडली.मतदारसंघात 56 हजार इतकी सर्वाधिक मते लिंगायत समाजाची आहे. त्याखालोखाल 42 हजार धनगर, 21 हजार अनुसूचित जाती, 21 हजार अनुसूचित जमाती, 22 हजार मुसलमान, 8 हजार जैन तर 6 हजार मराठा समाजाची मते आहेत.लिंगायत समाजाने आजवर भाजपला पसंती दिली आहे. मात्र, स्वतंत्र लिंगायत धर्मासाठी छेडलेल्या आंदोलनानंतर समाजात वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाले आहेत. यामुळे लिंगायत मतांची विभागणी होण्याची शक्यता असून परिणामी याचा लाभ काँग्रेसला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावरच विजयाची गणिते अवलंबून राहणार आहेत.