Sat, Jan 18, 2020 23:41होमपेज › Belgaon › चोवीस तासांत भाजपची सत्ता

चोवीस तासांत भाजपची सत्ता

Published On: May 23 2019 1:40AM | Last Updated: May 23 2019 1:40AM
बंगळूर : प्रतिनिधी

एच. डी. कुमारस्वामी गुरुवारी सायंकाळपर्यंत मुख्यमंत्रिपदी असतील, असे भाकीत माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार डी. व्ही. सदानंदगौडा यांनी केले. बुधवारी (दि. 22) ते येथे पत्रकारांशी बोलत होते. गुरुवारी सायंकाळपर्यंत किंवा शुक्रवारी सकाळपर्यंत कुमारस्वामींचा कार्यकाळ असेल. लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर चोवीस तासांत कर्नाटकात काँग्रेस-निजद आघाडी सरकार कोसळेल आणि भाजप सरकार स्थापन होईल, असे सदानंदगौडा म्हणाले.

चंद्राबाबू नायडू आणि कुमारस्वामींचे विचार जुळतात. निकालानंतर आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील सरकारे कोसळतील. त्यामुळे दोघेही काम नसल्याने प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आंध्र प्रदेशात वाय.एस.आर.चा विजय होणार आहे. राष्ट्रीय राजकारणात त्यांनी स्वारस्य दाखवले तरी तेथेही त्यांची निराशा होईल, असा अंदाज सदानंदगौडा यांनी व्यक्‍त केला.

काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहाबाबत ते म्हणाले, रोशन बेग हे सात वेळा आमदारपदी निवडून आले. त्यांनी मंत्रिपदाचीही धुरा सांभाळली आहे. त्यांना पक्षातील बारकावे माहीत आहेत. सिद्धरामय्या अहंकारी नेते आहेत. त्यांच्याबाबत बेग यांना चांगलाच अनुभव आला आहे. त्यामुळेच त्यांनी जाहीर विधान केले आहे.

आता सुधाकर यांचे ट्विट

माजी मंत्री व विद्यमान काँग्रेस आमदार रोशन बेग यांच्यानंतर आता आ. डॉ. के. सुधाकर यांनी मतदान यंत्रांचे समर्थन करून वरिष्ठांना अडचणीत आणले आहे. याबाबत डॉ. सुधाकर यांनी ट्विटरवर आपले मत व्यक्‍त केले आहे. मतदान यंत्रांबाबत गोंधळ होता खरा. पण, एक्झिट पोलनंतर यंत्रांचा गैरवापर केल्याचा आरोप करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एक्झिट पोलमध्ये मतदारांचा कल कुणाच्या बाजूने आहे, याबाबतचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे. केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. याचा अर्थ मतदान यंत्रांचा गैरवापर केला, असा होत नसल्याचे सुधाकर यांनी म्हटले आहे.