Mon, Aug 19, 2019 03:25होमपेज › Belgaon › येडियुराप्पांना मिळणार केंद्रीय मंत्रिपदाची धुरा?

येडियुराप्पांना मिळणार केंद्रीय मंत्रिपदाची धुरा?

Published On: May 23 2019 1:40AM | Last Updated: May 22 2019 11:48PM
बंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटकात भाजपला वीसपेक्षा अधिक जागा मिळाल्यास माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांना वरिष्ठांकडून मोठी भेट दिली जाणार आहे. त्यांना राष्ट्रीय राजकारणात आणण्यात येणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

लोकसभा निवडणूक एक्झिट पोलनंतर केंद्रामध्ये पुन्हा भाजपची सत्ता स्थापन होणार असल्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे. कर्नाटकात भाजपला सुमारे 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस-निजद आघाडी सरकार पतन होईल, असे भाकीत करण्यात येत आहे. 

कर्नाटकातून जास्तीतजास्त जागांवर विजयी होण्यासाठी येडियुराप्पा यांनी पायाला चक्रे लावून प्रचारकार्यात भाग घेतला. त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे.

राष्ट्रीय राजकारणात त्यांचा समावेश होणार आहे. त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. 76 वर्षे वयाच्या येडियुराप्पांचा उत्साह अजूनही तरुणांना लाजवणारा आहे. त्यांना राज्यसभा सदस्यपदी नियुक्‍त करुन मंत्रिपदाबाबत विचार केला जात आहे. 

2014 मध्ये त्यांनी शिमोगा मतदारसंघातून निवडून आले होते. त्याचवेळी त्यांना मंत्रिपद देण्यात येणार होते. पण, थोडक्यात ही संधी हुकली. पण, यंदा त्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.

त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशामुळे राज्यातील त्यांची जागा कोण घेणार? असा प्रश्‍न निर्माण होणार आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी याआधीच अनेकांनी प्रयत्न चालवले आहेत. आघाडी सरकार कोसळल्यानंतर मुख्यमंत्रिपदी कोण येणार, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.