Sun, Apr 21, 2019 06:40होमपेज › Belgaon › उद्यमबागमध्ये हॉटेल, तांगडी गल्लीत दुचाकींची तोडफोड

उद्यमबागमध्ये हॉटेल, तांगडी गल्लीत दुचाकींची तोडफोड

Published On: Nov 08 2018 1:24AM | Last Updated: Nov 08 2018 1:24AMबेळगाव : प्रतिनिधी 

दोन हिंदुत्ववादी संघटनांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर एका तरुणाने दुसर्‍या संघटनेला पाठिंबा दिल्याच्या रागातून त्या तरुणाच्या हॉटेलवर हल्ला झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री  उद्यमबाग येथे घडली. त्यानंतर तांगडी गल्लीतही तीन दुचाकींचे  नुकसान करण्यात आले. या प्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

विराट हॉटेलचे मालक कपिल भोसले यांनी उद्यमबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. अनगोळ येथे एका हिंदुत्ववादी संघटनेने बैठक घेतली होती. या बैठकीला कपिल यांनी पाठिंबा दिल्याचा राग दुसर्‍या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना होता. याच रागातून एक गट उद्यमबागमधील कपिल यांच्या हॉटेलकडे गेला. त्यांना जाब विचारत त्यांनी धक्काबुक्की केली तसेच हॉटेलमधील बाटल्यांचे क्रेट विस्कटण्याबरोबरच बाटल्या फोडल्या. यानंतर कपिल यांनी उद्यमबाग पोलिसांत तक्रार दिली.    

तांगडी गल्लीत दुचाकींचे नुकसान

उद्यमबागमध्ये गोंधळ घातल्यानंतर काही तरुण कपिल राहात असलेल्या तांगडी गल्लीत आले. त्यांनी त्यांच्या घरासमोर लावलेली त्यांची दुचाकी पाडली, शिवाय बाजूच्या दोन दुचाकीही पाडल्या. यामध्ये तिन्ही दुचाकींचे नुकसान झाले. त्यानंतर खडेबाजार पोलिस निरीक्षक धीरज शिंदे यांनी रात्री तांगडी गल्लीत भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.