Thu, Dec 12, 2019 22:14होमपेज › Belgaon › बंगळूरच्या ज्योतिषाला अटक 

बंगळूरच्या ज्योतिषाला अटक 

Published On: Jul 22 2019 2:01AM | Last Updated: Jul 22 2019 2:01AM
बेळगाव : प्रतिनिधी

भविष्य सांगण्याच्या नावाखाली व दुःख दूर करण्याचे सांगत महिलेला 2 लाख 60 हजार रुपयांना गंडा घालणार्‍या ढोंगी ज्योतिषाला पोलिसांनी अटक केली.  विजयकुमार रायण्णा सुगते (वय 40, मूळ रा. रायचूर, सध्या रा. बंगळूर) असे या भामट्याचे नाव आहे. एपीएमसी पोलिसांनी रविवारी ही कारवाई केली. 

आपल्या संसारातील दुःख दूर करू, पती-पत्नीतील भांडणे सोडवून त्यांचा संसार आनंदाने करण्यासाठी आम्ही मदत करतो, अशा आशयाची वृत्तपत्रातील जाहिरात वाचून पतीपासून विभक्त झालेल्या महिलेने या ढोंगी सादूशी संपर्क साधला. त्याने या महिलेला आपण साई दुर्गादेवी ज्योतिष पांडित्य असून, व्ही. आर. गुरुजी असे आपले नाव सांगितले होते. आपण मूळचे कोळ्ळेगल (जि. चामराजनगर) असे सांगितले होते.

रक्कम घेतली ऑनलाईन  

तुमचे जे दुःख आहे, ते दूर करू असे सांगत सदर भामट्याने या महिलेकडून वेळोवेळी रक्कम घेतली. सदर महिला व भामट्याने एकमेकांना पाहिलेले नव्हते. तरीही फोनवरून त्याने असे काही सांगितले की त्याला भुलून सदर महिलेने भामट्याने दिलेल्या बँक खात्यावर थोडीथोडी अशी 2 लाख 60 हजार रूपयांची रक्कम जमा केली. यानंतर मात्र काहीच फरक पडत नसल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने एपीएमसी पोलिसांत तक्रार केली. याची दखल घेऊन पोलिस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी तपास सुरू केला होता. मार्केटचे एसीपी नारायण बरमणी व कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी प्रकाश गंडव्वगोळ व नागराज भीमगोळ यांनी बंगळूर येथून या भामट्याला अटक करून बेळगावात आणले. पोलिसांनी केलेल्या या कामाचे पोलिस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार यांनी कौतुक केले आहे.