Mon, Dec 09, 2019 11:02होमपेज › Belgaon › पुस्तकातील चुकांविरोधात जाब विचारणार

पुस्तकातील चुकांविरोधात जाब विचारणार

Published On: Jun 10 2019 1:30AM | Last Updated: Jun 10 2019 12:43AM
बेळगाव : प्रतिनिधी

पाठ्यपुस्तकांत  गंभीर चुका करून मराठी विद्यार्थ्यांना चुकीचे शिकवले जात आहे. सुरुवातीलाच चुकीचे मराठी शिकवले तर, मुलांच्या शिक्षणावर भविष्यात गंभीर परिणाम होतील. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील चुकांविरोधात प्रशासनाला जाब विचारून जादा चुका असलेल्या पुस्तकांचे पुनर्प्रकाशन करावे, अशी मागणी करण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बैठकीत करण्यात आला. रविवार जत्तीमठ येथे झालेल्या युवा समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानी शुभम शेळके होते. सचिव श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले.

या बैठकीत मराठी पाठ्यपुस्तकात शिक्षण खात्याने केलेल्या गंभीर चुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. केवळ मराठी पाठ्यपुस्तकांबाबत दरवर्षी चुका होत आहेत. यंदा तर अनुक्रमणिकापासूनच गंभीर चुका आहेत. असे चुकीचे पुस्तक विद्यार्थ्यांना शिकवले तर, त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या चुकांबाबत प्रशासनाला जाब विचारणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या दोन दिवसांत या चुकांबाबत जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. चुकीचे मराठी असलेली सर्व पुस्तके परत घेऊन त्या चुका दुरुस्त करून पुनर्प्रकाशित करून वितरण करावे, अशी मागणी करण्यात येणार आहे. सर्व संमतीने हा निर्णय घेण्यात आला.

या विषयावर शुभम शेळके, साईनाथ शिरोडकर, श्रीकांत कदम, बळवंत पाटील, रोहन लंगरकांडे, नितीन आनंदाचे आदींनी मनोगत व्यक्‍त केले. बैठकीच्या प्रारंभी महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार संभाजी पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

बसचालकांविरोधातही आंदोलन छेडणार

युवा समितीच्या या बैठकीत बसचालकांच्या मुजोरीमुळे विद्यार्थी आणि प्रवाशांना फटका बसत आहे. पासधारक विद्यार्थ्यांना बसमध्ये घेतले जात नाही. थांबा सोडून पुढे नेऊन बस थांबवल्या जातात, या विषयावरही चर्चा झाली. त्यामुळे याबाबत वरिष्ठांना भेटून याची कल्पना देणे आणि प्रसंगी आंदोलन करण्याचा निर्णय झाला.