Thu, Dec 12, 2019 22:14होमपेज › Belgaon › खा.जोल्लेंसमोर विविध आव्हानांचा डोंगर

खा.जोल्लेंसमोर विविध आव्हानांचा डोंगर

Published On: May 26 2019 1:44AM | Last Updated: May 25 2019 11:48PM
चिकोडी : काशिनाथ सुळकुडे

पाच वर्षाच्या कालावधीत  राज्यात सर्वाधिक 850 कोटींचा निधी खेचून आणलेल्या खासदार प्रकाश हुक्केरींच्या ताब्यातील  चिकोडी लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यात भाजपाला यश आले आहे. पण चिकोडीचे  नूतन खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्यासमोर मतदारसंघातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासह पाणी योजना, रेल्वे मार्ग, चिकोडी जिल्हा निर्मिती, औद्योगिक वसाहतीची निर्मितीसह अनेक समस्या सोडविण्याचे आव्हान असणार आहे. 

चिकोडी जिल्ह्याचा प्रश्‍न 

बेळगाव जिल्हा  हा  राज्यात  भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा असल्यामुळे प्रशासकीय कारभार चालविण्यास  व विकासासाठी  जिल्ह्याचे विभाजन करुन नव्या चिकोडी जिल्ह्याची निर्मिती करण्याची मागणी 25 वर्षापासून प्रलंबित आहे. या  निवडणूकीतदेखील जिल्हा प्रश्‍न चांगलाच गाजला होता. त्यामुळे या भागाचे खासदार म्हणून त्यांनी राज्य सरकारवर दबाव टाकून चिकोडी जिल्ह्याची निर्मिती करुन घेण्याची मोठी जबाबदारी आहे.

औद्योगिक वसाहतीची निर्मिती 
चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत शेतीशिवाय दुसरे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने रोजगाराची समस्या मोठी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 7 दशकांचा काळ लोटला तरी या भागात आजपर्यंत एकाही सरकारने औद्योगिक धोरण राबविलेले नाही. यामुळे आज या भागातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या शोधात शेजारच्या महाराष्ट्र राज्यात जातो. शेजारच्या कोल्हापूर, इचलकरंजी, कागल, मिरज.सांगली, कुपवाड येथील एमआयडीसीत 70 टक्के कामगार हे चिकोडी भागातील आहेत. त्यामुळे या भागातील लोकांना येथेच रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मोठ्या औद्योगिक वसाहतीची  उभारणी करणे गरजेचे आहे. तसेच बोरगाव टेक्स्टाईल पार्क, मांगूर सिल्वर पार्कचा विकास करावा.

पाणी योजना 
 चिकोडी लोकसभा मतदारसंघातून कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा नद्या वाहत असल्या तरी 50 टक्के भाग पाण्यापासून वंचित आहे. त्यामुळे या भागात  नद्यांच्या जोडणीसह कोटबागी, करगांव, महालक्ष्मी, कालव्यांना पाणी योजनांसह इतर  कायमस्वरुपी पाणी योजना राबवून हरितसक्रांती करण्याची मागणी होत आहे. नेहमी उन्हाळ्यात नद्यांचे पात्र कोरडे पडल्याने गंभीर पाणी समस्येला सामोरे जावावे लागत आहे. यामुळे महाराष्ट्र शासनाशी शाश्‍वत करार करण्यासोबत  मांजरी किंवा  कुडचीनजीक बंधारा उभारण्याची गरज आहे.

महालक्ष्मी  व करगांव जलउपसा सिंचन योजना 
  चिकोडी लोकसभा मतदारसंघात अनेक वर्षांपासून कृष्णा व हिरण्यकेशी नदीतून पाण्यावर अवलंबित  महालक्ष्मी व करगांव जलउपसा सिंचना योजना  प्रलंबित आहे. यामुळे जोल्लेंनी  माळभागावरील चिंचणी, कोथळी, नवलिहाळ, खडकलाट, नाईंगलज, पट्टणकुडी, वाळकी, रामपूरसह 10 खेड्यांची पाणी समस्या  सोडविण्यासाठी महालक्ष्मी जलउपसा सिंचना योजना तर नागरमुन्नोळी  भागातील 12 खेड्यांना  उपयोगी करगांव जलउपसा सिंचन योजना राबविण्यावर भर देण्याची गरज आहे.

द्राक्षांना बाजारपेठ, शितगृहाची निर्मिती
मतदारसंघातील अथणी, शिरगुप्पी, कागवाड भागात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे पीक घेतले जाते. पण अनेकदा अतिवृष्टीमुळे व पावसाअभावी द्राक्ष पिकांचे नुकसान होत असते. त्यामुळे द्राक्षे संग्रहित करण्यासाठी परिसरात शितगृहाची उभारणी करुन द्यावी. तसेच शेतकर्‍यांना  द्राक्षे व बियाणे विक़्रीसाठी शासनाकडून खरेदी केंद्र सुरु करुन देण्याची गरज आहे.

क्षारपाड जमिनीची समस्या सोडविणे
कृष्णा, दूधगंगा व वेदगंगेचे पाणी बारामाही उपलब्ध असल्यामुळे मागील दोन दशकात शेतकरी ऊस पिक घेण्यावर भर देतात. यात भरघोस पाणी पुरवठा व खतांच्या अतिवापरामुळे आज नदकाठावरील जमिन क्षारपड बनली आहे. यामुळे शेकडो एकर क्षारपड जमिन नापिक बनून उत्पादनात मोठी घट झाली आहे. यासाठी या भागातील जमिन क्षारपडमूक्त करण्यासाठी विशेष पॅकेज मंजूर करुन  योजना राबविण्याची गरज आहे. 

रेल्वे योजनांवर भर आवश्यक  
कर्नाटक व महाराष्ट्राला जोडणार्‍या कराड-कोल्हापूर-बेळगावधारवाड रेल्वे योजना  व्हावी ही सीमावासियांची अनेक वर्षांची मागणी आहे.  या मार्गाचा  सर्व्हे  होवून देखील अद्याप काम प्रलंबित आहे. तसेच  मंजूर झालेल्या  कुडची-बागलकोट नव्या  रेल्वेमार्गाचे  भूहस्तांतरण पूर्ण झाले असले तरी मंदगतीने काम सुरु आहे. त्यामुळे वेळेत काम पूर्ण करुन घ्यावे.  लोकसभेतील कुडची, रायबाग, घटप्रभा, गोकाकसह एकाही रेल्वे स्थानकाचा दर्जा वाढविलेला नाही. यामुळे ब्रिटीशांच्या काळापासून असलेली रेल्वेस्थानके त्याच अवस्थेत आहेत. यासाठी विशेष पॅकेज राबवून  रेल्वे स्थानकांचा विकास करावा. 

प्रत्येक तालुक्यात केंद्रीय विद्यालय आवश्यक 
 चिकोडी लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदचा खा. प्रकाश हुक्केरींनी चिकोडीत दोन केंद्रिय विद्यालये मंजूर केल्याने अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला आहे. त्यामुळे नूतन खा. जोल्लेंनी चिकोडीप्रमाणे मतदारसंघातील अथणी, निपाणी, रायबाग, कागवाड, हुक्केरी, अथणीसह सर्व तालुक्यांमध्ये केंद्रिय विद्यालये मंजूर करण्याची गरज आहे. 

आठही मतदारसंघांवर लक्ष देणे 
 राज्यात सर्वात मोठे कार्यक्षेत्र लाभलेल्या चिकोडी लोकसभा मतदारसंघात आठ विधानसभा मतदारसंघ व पाच तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे नूतन खासदारांनी सर्व तालुक्यांतील समस्या जाणून घेऊन संपूर्ण मतदारसंघाचा विकास करण्यावर भर देणे आवश्यक आहे.