बेळगाव : प्रतिनिधी
सांबरा विमानतळावरून बुधवारी (दि. 11) अलायन्स एअरच्या विमानसेवेला प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा प्रशासन व विमानतळ प्रशासन अधिकार्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व केक कापून विमानसेवेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी खा. सुरेश अंगडी, जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन, कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओ दिव्या शिवराम, एअर इंडियाचे मुख्य प्रादेशिक संचालक एम. व्ही. जोशी, बेळगाव विमानतळ संचालक राजकुमार मौर्य आदी अधिकारी उपस्थित होते.
खा. अंगडी यांनी विमानाच्या पहिल्या तीन प्रवाशांना तिकीट प्रदान केले. अॅप्टेक अॅकॅडमीचे विद्यार्थी, स्थानिक हॉटेलच्या प्रतिनिधींकडून स्वागत करण्यात आले. यावेळी खा. अंगडी यांनी, बेळगाव विमानतळावरून जादा विमानसेवा सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. एम. व्ही. जोशी यांनी बेळगावमधून विविध ठिकाणी सेवा सुरू करण्याची ग्वाही दिली. यावेळी दक्षिण विभागातील वाणिज्य विभागाचे सरव्यवस्थापक राजाबाबू, एअर इंडिया दिल्लीच्या शीला जैन, बेळगावचे वाणिज्य व्यवस्थापक पी. एस. देसाई आदी अधिकारी उपस्थित होते.