Sun, Dec 15, 2019 05:58होमपेज › Belgaon › जिंकणार मराठी ... हरणारही मराठीच

जिंकणार मराठी ... हरणारही मराठीच

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: Apr 30 2018 11:12PMबेळगाव : प्रतिनिधी

मराठमोळा चेहरा असणार्‍या खानापूर विधानसभा मतदारसंघात  जवळपास सारेच उमेदवार मराठी भाषिक आहेत. त्यामुळे जिंकणार मराठी... आणि हरणारदेखील मराठीच, असे चित्र आहे.

या मतदारसंघात केवळ एकदा म. ए. समितीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. अन्यवेळी म. ए. समितीचे वर्चस्व राहिले आहेत. मराठी भाषिक मतदार बहुसंख्येने असल्याने मराठी उमेदवार सातत्याने निवडून येत आहे. समितीमध्ये काहीवेळा बेकी निर्माण झाली त्यावेळीदेखील येथून समितीचाच उमेदवार निवडून आलेला आहे. हा या मतदारसंघाचा इतिहास आहे. 

परंतु, यावेळी म. ए. समिती उमेदवारांना धक्‍का देण्याचा प्रयत्न राजकीय पक्षाच्या उमेदवाराकडून सुरू आहे. काँग्रेसने डॉ. अंजली निंबाळकरांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने विठ्ठल हलगेकर यांना पसंदी दिली आहे. हे दोन्ही उमेदवार मराठी भाषिक असून त्यांच्याकडून म. ए. समितीला आव्हान देण्यात आले आहे. 

म. ए. समितीने आ. अरविंद पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर माजी जि. पं. सदस्य विलास बेळगावकर यांनी त्यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.  निजदचे उमेदवार नासीर बागवान यांचेही आव्हान उमेदवारांना काही प्रमाणात पेलावे लागेल. तथापि शनिवारी प्राप्तिकर खात्याने छापा टाकल्याने या कारवाईचा निजदच्या प्रचारावर काहीसा परिणाम जाणवणार आहे. त्यावर मात करुन बागवान प्रचारयंत्रणा कशी राबवतात, त्यावरही गणित अवलंबून आहे.

पहिल्या टप्प्यात बड्या नेत्यांनी सभा घेवून प्रचारात रंगत आणली आहे. काही दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री   एच. डी. कुमारस्वामी यांची निजद उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सभा डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारासाठी झाली. सोमवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा झाली. तर म. ए. समितीचे उमेदवार आ. अरविंद पाटील यांच्या प्रचाराचा नारळ प्रा. एन. डी. पाटील यांच्या उपस्थितीत फुटला. मान्यवरांच्या सभामुळे तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.विलास बेळगावकर यांचा आपल्या सहकार्‍यासमवेत एकाकी प्रचार सुरू आहे. ते थेट मतदारांच्या गाठीभेटी घेताना दिसून येत आहे.