Tue, Jun 18, 2019 11:14होमपेज › Belgaon › एकाच टप्प्यात कृषी कर्जमाफी

एकाच टप्प्यात कृषी कर्जमाफी

Published On: Jun 13 2019 1:31AM | Last Updated: Jun 13 2019 1:31AM
बंगळूर : प्रतिनिधी

वाणिज्य बँकांकडून शेतकर्‍यांच्या कृषी कर्जमाफीबाबत निर्माण झालेल्या गोंधळावर मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी तोडगा काढला आहे. वाणिज्य बँकांमध्ये असणारी शेतकर्‍यांच्या कृषी कर्जाची उर्वरित रक्‍कम एकाच टप्प्यात मंजूर करण्याचे आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी बुधवारी (दि. 12) दिली आहे.

याआधी कर्जमाफी योजनेंतर्गत वाणिज्य बँकांना चार टप्प्यांत रक्‍कम देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले होते. त्याकरिता पहिल्या टप्प्यातील 3 हजार कोटींची रक्‍कम मंजूर केली होती. पण, ही रक्‍कम शेतकर्‍यांच्या खात्यांवर वर्ग करताना गोंधळ करण्यात आला. यामुळे सुमारे 13 हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची वेळ आली. यामुळे मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे आता 7.49 लाख शेतकरी कर्जमुक्‍त होणार आहेत. वाणिज्य बँकांतून शेतकर्‍यांनी घेतलेल्या कर्जाची एकूण रक्‍कम 7,563.27 कोटी इतकी आहे. त्यावरील व्याज 983.84 कोटी रु. होते. एकूण 8,547.46 कोटींची कर्जमाफी करण्यात येणार आहे. यापैकी राज्य सरकारकडून 3930.15 कोटी रु. रक्‍कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.