Sun, Dec 15, 2019 03:14होमपेज › Belgaon › अळंबी शेतीतून उत्पन्‍नाचा नवा स्रोत

अळंबी शेतीतून उत्पन्‍नाचा नवा स्रोत

Published On: Jul 19 2019 2:13AM | Last Updated: Jul 18 2019 9:03PM
बेळगाव : प्रतिनिधी

नुसती अळंबी म्हटले तरी तिची चव जिभेवर रेंगाळू लागते. यामुळे बाजारातही तिला मोठी मागणी आहे. अगदी  साध्या ढाब्यापासून पंचतारांकित हॉटेल्समध्ये मागणी असल्याने शेतकर्‍यांना यातून उत्पन्नाचा नवा स्रोत सापडू शकेल. अळंबीचे पीक घेण्यासाठी जागेचीही फारशी अडचण नाही. अगदी घरातील फडताळापासून ते छपरावरही तिचे सहज पीक घेतले जाते.

वाढत्या मागणीमुळे हमी भावाचीही फारशी चिंता उरत नाही. अनेक अळंबी उत्पादक हजारांचे मासिक उत्पन्न कमवत आहेत. त्याचबरोबर इतर शेतकर्‍यांना प्रशिक्षण देऊन या नव्या व्यवसायाची त्यांना ओळख करून देत आहेत.

काही अळंबी उत्पादक अळंबीची निर्यातही करत आहेत. मात्र निर्यात करण्यात येणार्‍या अळंबीची विशेष काळजी घ्यावी लागते. विशेष करून ती जंतुविरहित तसेच सहा महिन्यांहून जुनी असू नये. अळंबीची लागवडीसाठी गहू, ज्वारी, मका, हरभर्‍याच्या भुशामध्ये अळंबीचे बी पेरले जाते. या बिया जैवतंत्रज्ञानासह तयार केल्या जातात. खोडवा पद्धतीने अळंबीची लागवड केली जाते. साधारण  25 दिवसांनंतर पहिले पीक तयार होते. त्यानंतर दर सहा दिवसांनंतर काढणी केली जाते. अशा प्रकारे एका लागवडीपासून दोन महिन्यांमध्ये दहा पिके हाती लागतात असे काही अळंबी  उत्पादक सांगतात. शेड, कुडाचे घर आणि छप्पर तसेच घरातील फडताळातही अळंबीचे पीक घेता येते. मात्र थंड हवामान लागणार्‍या या पिकाचा ऊन आणि पावसापासून बचाव करणेही तितकेच आवश्यक असते. अळंबीला हॉटेलमध्ये मोठया प्रमाणावर मागणी आहे. मशरूम समोसा, आवळा मशरूम जाम, मशरूमवडा, भाजी अशा वेगवेगळया पदार्थांना मोठी मागणी आहे. महिन्याकाठी जवळपास  50 ते  60 किलो अळंबी काही उत्पादक पिकवतात.

सध्याची शेतीची अवस्था पाहता शेतकर्‍यांनी अळंबीचे पीक घेतल्यास त्यांच्यासाठी चांगला उत्पन्नाचा स्रेत मिळू शकतो.

अळंबीमध्ये औषधी गुणधर्म

अळंबीचा उपयोग औषधांमध्येही केला जातो. संधिवात, मूळव्याध, मधुमेह, कर्करोग यांसारख्या व्याधींसाठीच्या औषधांमध्ये याचा वापर केला जातो. अ, ब आणि क या जीवनसत्त्वांनी युक्त असलेल्या अळंबीत मानवी शरीरासाठी आवश्यक  अमिनो आम्ल उपलब्ध असल्याचे शास्त्रज्ञांच्या प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. फळे, अंडी वा अन्य मांसाहारी पदार्थामध्ये शरीरासाठी आवश्यक जीवनसत्त्व एकत्रित मिळत नसल्याचा दावाही शास्त्रज्ञांनी केला आहे.

प्रक्रिया उद्योगासाठीही संधी

अळंबीचे पीक हे शेतकर्‍यांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणारे पीक आहे. अळंबीपासून विविध उपपदार्थ तयार केले जाऊ शकतात. पापड, लोणचे, सूप पावडर अशा उपपदार्थाच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग उभा राहू शकतो. 

मशरूम व्यवसायाला प्रचंड संधी

देशभरात सध्या दररोज  200 टन म्हणजे वर्षांला 73 हजार टन मशरूम उत्पादन होते. खाण्याच्या बाबतीत मधुमेह, हृदयरोग या वाढत्या आजारामुळे लोकांत जागृती वाढली आहे. या आजाराला निमंत्रण देणार नाही असे पदार्थ खाण्याकडे आता कल वाढतो आहे त्यामुळे देशाच्या गरजेच्या तुलनेत मशरूमचे उत्पादन अत्यल्प होते. 

अळंबीला मटणाहून जादा दर

उच्च दर्जाचे जीवनसत्व, प्रथिनांनी ठासून भरलेली पावसाळ्याच्या दिवसात नैसर्गिकरित्या उगवलेली अळंबी बेळगाव बाजारपेठेत शेतकरी विक्रीस घेऊन येत आहेत. सध्या अळंबीचे दर गगनाला भिडलेले असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे. बाजारात 5 अळंबींची एक जुडी 80 ते 100 रूपयाला विक्री होत आहे.   म्हणजे जवळपास अळंबीला मटणाचा दर आला आहे. 

आरोग्यदायी असल्याने येथील नागरिकांच्या आहारशैलीचा तो एक अविभाज्य भाग बनला आहे. नैसर्गिक आळंबी ज्यांना ओळखता येते ते बेळगाव परिसरात आळंबी शोधण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी बाहेर पडतात. अळंबी आढळल्यास तीच्या सभोवती खोदून ती मुळासकट काढली जाते. खाण्यायोग्य अळंबी ओळखयला कौशल्य लागते. कारण उगवणार्‍या सर्वच आळंबी खाण्यायोग्य नसतात. काही आळंबी या विषारीही असतात. त्यामुळे जाणकारांच्याकडूनच अळंबी घेणे हितकारक असते. मागील 15 वर्षांपासून काही शेतकरी आणि संस्था कृत्रिम पद्धतीने अळंबी पिकवत आहेत. तिचा दर साधारणपणे 100 ग्रॅमच्या पाकिटाला 50 ते 60 रूपये आङे. मात्र नैसर्गिकपणे उगवलेल्या अळंबीला जी चव असते ती कमालीचीच असते असे आळंबीप्रेमी सांगतात. त्यामुळे असे ग्राहक अळंबीचा मटणाहून जादा दर  असला तरी ती खरेदी करत आहेत.

विषारी अळंबीपासून सावधान : तज्ज्ञांच्या मते अळंबी ही हरितद्रव्य विरहीत फळधारणा करणारी बुरशी आहे. पुरातण काळापासून संस्कृतमध्ये कुसुंप आणि पौराणिक ग्रंथात भूछत्र म्हणून अळंबीचा उल्लेख आहे. अळंबी औषधीयुक्त आहार असून निसर्गाकडून मिळालेली ती देणगी आहे. मात्र यातील काही अळंबी ही विषारीही असते. जी ओळखता येणे आवश्यक आहे.

5 अळंबीच्या जुडीचा दर 80  ते 100 रू.