Sun, Dec 15, 2019 05:56होमपेज › Belgaon › ऑनलाईनद्वारे ८० हजारांची फसवणूक

ऑनलाईनद्वारे ८० हजारांची फसवणूक

Published On: Jun 16 2019 1:44AM | Last Updated: Jun 15 2019 11:15PM
बेळगाव : प्रतिनिधी  

सध्या बहुतांश खरेदी विक्रीचे व्यवहार ऑनलाईनद्वारे करणे सुलभ झाले आहे. त्यामुळे मोबाईल, संगणक, दुचाकी, चारचाकी या वाहनांसह कपडे आदी साहित्य ऑनलाईनद्वारे खरेदी-विक्री केले जाते. ऑनलाईन खरेदी-विक्री संकेतस्थळावरून दुचाकी खरेदी करणार्‍या होनगा येथील युवकाची फसवणूक करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. त्याने पोलिसांत धाव घेतली आहे. 

दुचाकी  खरेदी करण्यासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून 80 हजार रू. अदा केल्याची तक्रार होनगा येथील नागराज सुणगार याने येथील सायबर क्राईम पोलिस स्थानकात केली आहे.  सैनिक पेहराव असणार्‍या व्यक्‍तीकडून सदर तरूणाला दुचाकीचा फोटो पाठवून फसवणूक करण्यात आली आहे. 

एका खासगी कंपनीत कामाला असणार्‍या नागराज सुणगारने ऑनलाईन दुचाकीची पाहणी केली होती. दि.12 जून रोजी त्याने सदर संकेतस्थळावर दुचाकी पाहून संबंधित व्यक्‍तीला मोबाईलद्वारे संपर्क साधला होता. सदर व्यक्‍तीने आपण सैन्यात असून फसवणूक करणार नसल्याची ग्वाही दिली होती. त्याने नागराजच्या व्हॉटस् अ‍ॅपवर सैनिक असल्याचे दाखविण्यासाठी  कॅन्टीन कार्ड,  फोटो व आधार कार्ड क्रमांक पाठविला होता. ही सर्व कागदपत्रे पाहून नागराजने त्याच्यावर विश्‍वास ठेवला व  टप्प्याटप्प्प्याने त्या व्यक्‍तीला 80 हजार 900 रूपये  अदा केले. 

दुचाकी पॅकिंग करण्यात आली असून लवकरच  तुम्हाला मिळणार आहे, असे सांगून सदर व्यक्‍तीने पुन्हा 3150 रू. ची मागणी केली होती. वाट पाहूनही दुचाकी मिळत नसल्याने नागराजने त्या व्यक्‍तीला पुन्हा फोन केला व चौकशी केली. पैसे नाही दिल्यास व्यवहार रद्द करू असे सांगितले. यानंतर अनेकवेळा फोन केला तरी सदर व्यक्‍ताचा संपर्क होऊ शकला नाही.  यावरून आपण फसल्याचे नागराजच्या लक्षात आल्याने त्याने पोलिसात धाव घेतली.