Sun, Dec 15, 2019 03:14



होमपेज › Belgaon › बेळगाव ७६, तर चिकोडीसाठी २२ अर्ज

बेळगाव ७६, तर चिकोडीसाठी २२ अर्ज

Published On: Apr 05 2019 1:47AM | Last Updated: Apr 05 2019 12:07AM




बेळगाव : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल 42 जणांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे बेळगाव लोकसभा मतदारसंघांसाठी एकूण 76 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये म. ए. समितीच्या वतीने 47 मराठी भाषिकांनी अर्ज दाखल केले. तांत्रिक अडचणी आणि प्रशासनाकडून अडवणूक यामुळे अपेक्षित 101 अर्ज भरण्यात मराठी भाषिकांना अपयश आले. तरीही उमेदवारसंख्या 65 हून जास्त झाल्याने निवडणूक आयोगाला बेळगावच्या मतदानासाठी वेगळी तरतूद करावी लागणार आहे. दरम्यान, चिकोडी मतदारसंघासाठी एकूण 22 अर्ज दाखल झाले आहेत. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवार हा अखेरचा दिवस होता. त्यामुळे सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालय  गजबजून गेले होते. म. ए. समितीचे कार्यकर्ते व भाजपचे उमेदवार सुरेश अंगडी यांनी प्रामुख्याने अर्ज दाखल केले.

समितीने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी अधिकाधिक अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र, 9 सूचक प्रमाणपत्रे अल्पावधीत जमविणे अवघड गेले. परिणामी, 101 ही संख्या गाठता आली नाही. तरीही 47 अर्ज भरून समितीने बेळगावकडे निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले आहे. 

सकाळी 10.30 वा. खानापूर म. ए. समितीच्या आठ कार्यकर्त्यांनी माजी आ. अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली अर्ज दाखल केले. यामध्ये खानापूर ता. पं. अध्यक्षा नंदा कोडचवाडकर, खानापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष रामचंद्र पाटील यांचा समावेश होता. गोपाळ पाटील, विकास कलघटगी, ता. पं. सदस्य रावजी पाटील, ता. म. ए. समिती  सरचिटणीस एल. आय. पाटील आदींसह शहर आणि तालुका म. ए. समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

गुरुवारी दाखल झालेले अर्ज

खानापूर ता. पं. अध्यक्षा नंदा मारुती कोडचवाडकर,  गोपाळ बी. देसाई, कृष्णकांत बिर्जे (बैलूर), विजय मादार, रणजित पाटील, खानापूर एपीएमसी अध्यक्ष रामचंद्र पाटील, रामचंद्र गांवकर, निळकंठ पाटील, अ‍ॅड. आनंद पाटील, श्रीकांत कदम, अशोक चौगुले, नितीन आनंदाचे, लक्ष्मण मेलगे, प्रकाश  नेसरकर, निळकंठ एम. पाटील, विश्‍वनाथ बुवाजी, प्रणाम पाटील, संजय कांबळे, शंकर चौगुले, नागेश बोभाटे, संदीप लाड, सचिन निकम, गजानन ठोकणेकर, विनायक गुंजटकर, मारुती चौगुले, कविता कोले, राजेंद्र पाटील,आशुतोष कांबळे, कल्लाप्पा कृष्णा  कोवाडकर, संजय पाटील, प्रभाकर  पाटील, सुरेश राजूकर, लक्ष्मी सुनिल मुतगेकर, सचिन केळवेकर.