Thu, Dec 05, 2019 20:47होमपेज › Belgaon › ६ विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न

६ विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न

Published On: Nov 29 2018 12:57AM | Last Updated: Nov 28 2018 11:24PMचिकोडी : प्रतिनिधी 

शाळेच्या मैदानावर फुटबॉल  खेळणार्‍या मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न बुधवारी चिकोडीत झाला. निपाणी - मुधोळ राज्यमार्गालगत सेंट फ्रान्सिस इंग्लिश मीडियम स्कूल आहे. शाळेचे विद्यार्थी  दर्शन रमेश उपासे, सार्थक भरत कुंभार, सुदर्शन एस. पोतदार, यशवंत बी. के., भरत एस. कल्लोळीकर (सर्व इयता 5 वी) व कार्तिक मंजुनाथ कोटगी (इयता पहिली) अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली.

विद्यार्थ्यांचे केवळ  दप्तर आढळल्याने पालक व शिक्षक भयभीत झाले. तासाहून अधिक काळ शोधूनही शोध लागत नव्हता. एका विद्यार्थ्याचे वडील शंकर गुडमी यांनी शिक्षकांना फोन करून सहा विद्यार्थी जैनापूर हद्दीत सापडल्याचे सांगितले. यानंतर सर्व पालक, शिक्षक व पत्रकारांनी तिकडे धाव घेतली. तेथे ते आढळले. त्यानंतर वाहनातून विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यात आले. पोलिसांनाही माहिती कळवण्यात आली. पोलिस व पालकांनी विद्यार्थ्यांकडे चौकशी करता विद्यार्थ्यांनी घडलेला प्रसंग सांगितला. ‘फुटबॉल खेळत असताना बॉल बाहेर गेला. तो आणण्यासाठी आम्ही बाहेर गेलो. यावेळी एका क्रूझर वाहनातून तोंडाला काळे कापड बांधलेले लोक आले. त्यांनी आम्हाला गाडीत घालण्याचा प्रयत्न केला; पण आम्ही आरडाओरडा करत रस्ता ओलांडून शेतातून धावत सुटलो. पुढे डोंगरावर शंकर गुडमींना भेटलो. अपहरणकर्ते कन्नड बोलत होते.’ शाळा प्रशासनाविरोधातही पालकांनी रोष  व्यक्त केला. चिकोडी पोलिस तपास करीत आहेत.