होमपेज › Belgaon › ग्राहक न्यायालयात महिन्याला ५०० तक्रारी 

ग्राहक न्यायालयात महिन्याला ५०० तक्रारी 

Published On: Mar 15 2019 1:44AM | Last Updated: Mar 14 2019 10:36PM
बेळगाव : परशराम पालकर

एखाद्या व्यवहारात फसवणूक झाल्यास दाद मागण्यासाठी ग्राहक न्यायालयाची स्थापना करण्यात आली. आहे. याठिकाणी तक्रार दाखल करून न्याय मिळविता येतो. बेळगावमध्ये 1989 मध्ये कोर्ट आवारात ग्राहक न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणी आतापर्यंत 17,234  तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी 14,561 तक्रारी निकालात काढण्यात आल्या आहेत. आज जागतिक ग्राहक दिन. त्यानिमित्त घेतलेला आढावा.

ग्राहक न्यायालयात विविध सोसायटीत ठेवण्यात आलेल्या  ठेवी परत मिळवण्यासाठी 2 हजारहून अधिक तक्रारी ग्राहक न्यायालयात दाखल झाल्या आहेत. बँक, विमा व सहकारी खात्याच्या सर्वाधिक तक्रारी न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. 

संपूर्ण जिल्ह्यातून ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल होतात. सुरूवातीला वर्षाकाठी किमान एक हजार तक्रार दाखल होत होत्या. गतवर्षी  महिन्याला 250 ते 300 तक्रारी दाखल व्हायच्या. आता महिन्याकाठी 500 तक्रारी दाखल होत आहेत. त्यापैकी आपापसात समझोत्याने मिटविल्या जातात. बेळगावात 2004 मध्ये ग्राहक न्यायालयाची स्वतंत्र दुमजली इमारत बांधण्यात आली आहे. या ठिकाणी तक्रारींचा ओघ वाढल्याने दोन न्यायालयाची दालने उभारण्यात आली आहेत. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्यानंतर त्यानंतर दुरुस्तीसंदर्भात न मिळणारी सेवा, एमआरपीप्रमाणे पैसे न स्वीकारणे, मुदत उलटून गेली तरी ठेवी न मिळणे आदी तक्रारी ग्राहक न्यायालयात दाखल करता येतात. खरेदी-विक्रीच्या व्यवहारात दोन वर्षाच्या आत तक्रार दाखल करता येते. 5 लाखाच्या आत कोणत्याही स्वरुपाचे शुल्क नसते. 10 लाखाच्या आत 200 रु. व 20 लाखापर्यंत 400 रू. शुल्क ग्राहक न्यायालय आकारते. ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करण्यापूर्वी एक महिना अगोदर कंपनीला नोटिसीच्या माध्यमातून कल्पना द्यावी. त्यानंतर त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात घेऊन ग्राहक न्यायालयात दाद मागावी. यासाठी वकील ठेवण्याचीदेखील तरतूद आहे.