Sat, Dec 14, 2019 05:37होमपेज › Belgaon › ‘प्राप्‍तिकर’कडून ४ कोटींची रोकड जप्‍त

‘प्राप्‍तिकर’कडून ४ कोटींची रोकड जप्‍त

Published On: Apr 21 2019 1:39AM | Last Updated: Apr 21 2019 1:39AM
बंगळूर/विजापूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीतील पैशांचा गैरव्यवहार रोखण्यासाठी प्राप्‍तिकर विभागाने छापासत्र सुरू ठेवले असून, शनिवारी दिवसभरात कर्नाटकात सुमारे 4 कोटींची रोकड जप्‍त करण्यात आली. त्यापैकी सुमारे अडीच कोटींची रोकड वाहनाच्या स्टेपनीतून (अतिरिक्‍त टायर) नेली जात होती. ही कारवाई शिमोगा-भद्रावती मार्गावर झाली. तर बागलकोटमध्ये बँक कर्मचार्‍याच्या घरातून 1 कोटी रुपये जप्‍त करण्यात आले.

प्राप्‍तिकर विभागाच्या कर्नाटक-गोवा शाखेने बंगळूरहून शिमोगा आणि भद्रावतीकडे रोख रकमेची वाहतूक होत असल्याची निश्‍चित माहिती मिळताच वाहनांची तपासणी सुरू केली. एका वाहनात 2 हजाराच्या नोटांच्या स्वरूपातील 2 कोटी 30 लाख रु. सापडले. ही रक्‍कम वाहनाच्या स्टेपनीमध्ये दडवून ठेवण्यात आली होती. चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. भद्रावतीत आणखी शोध सुरू असून, आणखी 60 लाख रु. जप्त करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

महत्त्वाचे म्हणजे, जप्त करण्यात आलेल्या 2 हजार रु.च्या नोटांच्या प्रत्येक बंडलातील 4 नोटा काढून घेण्यात आल्या होत्या. म्हणजे वितरण करणार्‍या माणसांनीही भ्रष्टाचार केला, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

बागलकोटमध्ये कारवाई

स्थानिक दक्षता विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बागलकोटमधील नवनगर येथील एका बँक कर्मचार्‍याच्या घराची झडती घेतली असता निवडणुकीआधी वितरित करण्यासाठी लपवून ठेवण्यात आलेले 1 कोटी रु. हाती लागले. ही रक्‍कम 500 रुपयाच्या नोटांच्या स्वरूपात होती. 

विजापूरमध्ये कारवाई  

विजापूरमध्येही प्राप्‍तिकर विभागाने आणखी कारवाई करताना 10 लाखांहून अधिकची रोकड जप्त केली.

गोव्यामध्येही यासंदर्भात आयकर खात्याकडून शोध सुरू असून, गोव्यामध्ये ज्वेलरीचा व्यवसाय करणार्‍या दोघा बंधूंचा शोध घेण्यात येत असून, त्यांच्या निवासस्थानी शोध घेण्यात येत आहे. त्याचबरोबर दोन उद्योगांच्या ठिकाणीही सर्वेक्षण करण्यात येत आहे. या शोधातून 30 लाखांहून अधिक रक्‍कम जप्‍त करण्यात येत आहे. शनिवारी एकूण कर्नाटक आणि गोव्यामध्ये 4.5 कोटी रु.ची रक्‍कम जप्‍त करण्यात आली आहे.