Thu, Dec 12, 2019 22:40होमपेज › Belgaon › 222 अंगणवाड्या इमारतीच्या प्रतीक्षेत

222 अंगणवाड्या इमारतीच्या प्रतीक्षेत

Published On: Jul 09 2019 1:11AM | Last Updated: Jul 09 2019 12:51AM
निपाणी : राजेश शेडगे

सीडीपीओ कार्यालर्यांतर्गत चिकोडी-निपाणी तालुक्यातील 96 गावांतील 43 ग्रा. पं. कार्यक्षेत्रात  466 अंगणवाड्या कार्यरत आहेत. त्यापैकी 233 अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती असून 11 अंगवाड्यांच्या खोल्यांचे बांधकाम सुरू आहे. उर्वरित 222 अंगणवाड्यांना इमारतीची प्रतीक्षा असून ग्रामपंचायती, नगरपालिकांनी जागा देणे आवश्यक असल्याची माहिती सीडीपीओ अशोक कांबळे यांनी दिली.

येथील महिला व बाल कल्याण खात्याचे कार्यालयही भाडोत्री इमारतीत आहे. रामनगर रोडवरील इमारतीत 3 वर्षांपासून मासिक 13 हजार रूपये भाडे आदा केले जाते. कार्यालय दीड वर्षापासून अशोकनगरातील माणिकनगर रोडवर कार्यरत आहे. सदर जागा कमर्शियल असल्याने येथे जादा भाडे द्यावे लागत आहे. सीडीपीओ कार्यालयाच्या इमारतीसाठी पालिकेने जागा देण्याच्या मागणीचे निवेदन पालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.

सध्या 233 अंगणवाड्या प्राथमिक शाळेच्या खोलीत, ग्रा. पं. जागेत व समुदाय भवनमध्ये भरवण्यात येतात. निपाणी शहरात 70 अंगणवाड्या कार्यरत असल्या तरी  केवळ 13 अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे. सदलगा, बोरगाव व एकसंबा या निपाणी सीडीपीओच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्येही अंगणवाड्या आहेत. 

अंगणवाड्यांमध्ये 459 महिला शिक्षिका असून 7 जागा रिक्त आहेत. अंगणवाड्यांसाठी 252 साहाय्यिका असून 14 जागा रिक्त आहेत. वरिष्ठ सुपरवायझरच्या 3 जागा असल्या तरी 2 जागा रिक्त आहेत. सुपरवायझरच्या 15 जागा कार्यरत आहेत. एफडीसी क्लार्कची  1 जागा रिक्त आहे.

ममदापूर, संकनवाडी, बारवाड, शिरगाव, बेनाडी, कोगनोळी, हणबरवाडी, मनोचीवाडी, जत्राट येथे दोन व ढोणेवाडी येथे अंगणवाडीसाठी इमारतीचे बांधकाम सुरू आहे. 466 अंगणवाड्यांमध्ये 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील 16 हजार 902 मुलांना पाच दिवस दररोज दूध, मंगळवार व शुक्रवार अंडी दिली जातात. 3 ते 6 वर्षे वयोगटातील 15 हजार 115 मुले आहेत. त्यांना नाश्त्यामध्ये पुलाव, सांजा, सांबार दिले जाते. 3 हजार 252 गर्भवती, प्रसूत महिलांना दररोज अंडी व दूध तर 3 हजार 209 महिलांना मातृपूर्णा योजनेतून दुपारचे जेवण दिले जात आहे. 

राज्यात भाग्यलक्ष्मी योजना 1 एप्रिल 2006 पासून सुरू आहे. बीपीएल शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील 2 मुलींना या योजनेचा लाभ मिळतो. पंतप्रधान मातृवंदना योजनेतून 4 हजार 669 गर्भवती व बाळंतीन महिलांना पहिल्या बाळंतपणासाठी 5 हजार रूपये देण्याची योजना आहे. मुख्यमंत्री मातोश्री योजनेतून बीपीएल कुटुंबातील 1 हजार 108 गर्भवती महिलांना 3000 रूपये व 147 प्रसूत महिलांना 3000 रूपये देण्यात आले आहेत.

अंगणवाडी जागेसाठी निवेदने

अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत बांधण्यासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध होत असला तरी जागेअभावी 222 अंगणवाड्या भाडोत्री जागेत कार्यरत आहेत. सीडीपीओ कार्यालयाने चिकोडी व निपाणी तालुक्यातील नगरपालिका, ग्रा. पं. कार्यालय यांना एका अंगणवाडीसाठी  30 बाय 30 किंवा 30 बाय 40 आकाराची जागा देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.