हाजगोळी : हर्षवर्धन कोळसेकर
बेळगावला पाणी पुरवणार्या राकसकोप धरण परिसरात यंदा जूनपासून ऑगस्टच्या दुसर्या आठवड्यापर्यंत 3020 मि.मी. म्हणजेच तब्बल 120 इंच पाऊस झाला असल्याची नोंद राकसकोप पर्जन्यमापक केंद्राकडे झालेली आहे. पावसाची ही रेकॉर्डब्रेक कामगिरी असून, आतापर्यंत नोंद झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. पावसाने तीन हजार मि.मी.चा टप्पा ऑगस्टच्या दुसर्या आठवड्यात गाठल्याने यंदा पाऊस चार हजार मि.मी.चा टप्पा गाठेल, असाही अंदाज आहे.
राकसकोप धरण परिसरात दरवर्षी सरासरी 1800 ते 2500 मि.मी. (65 ते 100 इंच) पाऊस पडतो. यंदा मात्र 3020 मि.मी. हा विक्रम पावसाने 10 ऑगस्टलाच गाठला. येत्या काही दिवसांत पाऊस पुन्हा वाढेल, अशी शक्यता आहे. यंदा 30 जुलैला राकसकोप धरण ओव्हरफ्लो झाले. हाही गेल्या दहा वर्षांतील एक विक्रम आहे.
दोन दिवसांपासून हलका पाऊस
सोमवार व मंगळवारी राकसकोप परिसरात पावसाचा जोर ओसरला असून हलका पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे. परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. भात, ऊस, रताळी, नाचणी, भुईमूग तसेच चार्याचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करून शेतकर्यांना भरपाई देण्याची मागणी आता होत आहे.