Tue, Dec 10, 2019 13:44होमपेज › Belgaon › लक्झरी बसमध्ये १० लाखांची चोरी

लक्झरी बसमध्ये १० लाखांची चोरी

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 22 2018 1:25AMबेळगाव : प्रतिनिधी 

बंगळूरहून मुंबईला जाणार्‍या  प्रवासी बसमध्ये रोख 10 लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना बुधवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील सुतकट्टी घाटात घडली. पहाटे प्रवाशांसाठी घाटातील धाब्यावर चहासाठी बस उभी केली असता ही घटना घडली आहे. 

बंगळूरमध्ये फॅक्टरीमध्ये  कामाला असणारी व्यक्‍ती 10 लाख रक्‍कम मुंबई येथील आपल्या कार्यालयाला घेऊन जात होती. नेहमीप्रमाणे बस बुधवारी पहाटे चहापानासाठी उभी करण्यात आली होती. चालकाच्या बाजूच्या काचा बंद करण्यात आल्या नव्हत्या. या संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी बसमध्ये कोणीच नसल्याचे पाहून रक्‍कम लांबवली.

घटनेची माहिती काकती पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस अधिकार्‍यांनाही देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास हाती घेतला आहे. यापूर्वीही याच ठिकाणी 10 फेब्रुवारीला राजस्थानच्या सोनाराला लुटण्यात आले होते. बंगळूर-मुंबई मार्गावर प्रवास करणार्‍या खासगी बसमधील सोनाराचे 11 लाखांचे सोने लांबविण्यात आले होते. 

आजच्या व यापूर्वीच्या घटनेत साम्य असल्याने पोलिसांनी चोरट्यांनी योजनाबद्धरीत्या ही चोरी केली असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत काकती पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.