बेळगाव : प्रतिनिधी
गणपत गल्लीचा रस्ता गुरुवारी खुला करण्यात आला.शहरात काही प्रमुख ठिकाणी स्मार्टसिटी अंतर्गत रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. त्या अगोदर सिडीवर्क सुरू केले आहे. गणपत गल्ली कॉर्नर, पांगुळ गल्ली व भोई गल्लीत सिडीवर्क गेल्या तीन महिन्यांपासून सुरू होते. यामुळे बाजारपेठेत चारचाकी वाहने जात नव्हती. हे काम तातडीने व्हावे म्हणून दै. ‘पुढारी’तूनही वारंवार वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन ‘मनपा’ प्रशासनाने काम पूर्ण करून गुरुवार दि. 12 रोजी सकाळी हा रस्ता पूर्णपणे खुला केला. यामुळे शहरवासियांतून समाधान व्यक्त होत आहे.
आता पांगुळ गल्ली, भोई गल्ली येथील सिडीवर्कही तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे. ही कामे तीन महिने लांबणीवर पडल्याने शहरवासियांतून नाराजी होती. कोट्यवधींची बाजारपेठ कोलमडल्याने व्यापार्यांंनाही मोठा आर्थिक फटका बसला होता. शनिवार दि. 14 रोजी आंबेडकर जयंती आहे. येथून मिरवणुकीलाही अडथळा होता. जयभीम तरुण मंडळीनेही ‘मनपा’कडे या रखडलेल्या कामाविषयी तक्रार केली होती. गुरुवारी हा रस्ता पूर्णपणे खुला झाला आहे.
Tags :... finally, opened, Ganpati lane, ,belgaon news